मंत्रिपदाची महात्त्वाकांक्षा

प्रबोध देशपांडे, अकोला</strong>

खासदार किंवा आमदारकी ही प्रत्येक राजकीय नेत्याची महत्त्वाकांक्षा असते. सध्या युतीला चांगले दिवस असल्याने भाजप आणि शिवसेनेत इच्छुकांची संख्या वाढली असतानाच विधान परिषदेच्या आमदारांनाही विधानसभा लढण्याचे वेध लागले आहेत. मंत्रिपदासाठी विधानसभेचे आमदार असणे अधिक सोपे जाते हे गणित मांडून वरिष्ठ सभागृहातील आमदार विधानसभा लढण्याबाबत चाचपणी करीत आहेत.

विधान परिषदेपेक्षा मतदारांनी निवडून दिलेल्या विधानसभेवरील आमदाराचे राजकीय वजन जास्त असते. मंत्रिपदासाठीही त्यांना प्राधान्य दिले जाते. मात्र, देवेंद्र फडणवीसांच्या मंत्रिमंडळात अनेक विधान परिषद सदस्यांना मंत्रिपदाची ‘लॉटरी’ लागली. त्यामुळे भाजप-सेनेच्या विधानसभेतील आमदारांमधून नाराजीचा सूरही निघाला. भविष्यात विधान परिषद आमदारांना मंत्रिपद मिळेलच, याची शाश्वती नाही. त्यामुळे  त्यांना विधानसभेचे  वेध लागले आहेत.

पश्चिम विदर्भातील पाच जिल्हय़ांत विधान परिषदेचे दहा सदस्य आहेत. फडणवीसांच्या मंत्रिमंडळात दोघांना कॅबिनेट व तिघांना राज्यमंत्रिपदाची संधीही मिळाली. आता विधानसभा लढण्यासाठी तीन ते चार जण इच्छुक आहेत. त्यात प्रामुख्याने गृहराज्यमंत्री डॉ. रणजीत पाटील, शिवसेनेचे आमदार गोपीकिशन बाजोरिया, माजी राज्यमंत्री प्रवीण पोटे, आमदार अरुण अडसड किंवा त्यांचे पुत्र नगराध्यक्ष प्रताप अडसड आदींची नावे चर्चेत आहेत. पक्षाने आदेश दिल्यास विधानसभा लढण्याचे संकेत डॉ. रणजीत पाटील यांनी दिले आहेत. त्यांचा विधान परिषदेचा कार्यकाळ २०२३ पर्यंत आहे. मुख्यमंत्र्यांचे अत्यंत विश्वासू समजले जाणारे डॉ. पाटील गेल्या निवडणुकीतही बाळापुरातून लढण्यासाठी इच्छुक होते. मात्र, केंद्रीय राज्यमंत्री संजय धोत्रे व रणजीत पाटील गटांच्या शह-काटशहाच्या राजकारणात त्यांना उमेदवारी मिळाली नाही. कुरघोडीमुळे शेवटी बाळापूरमध्ये भाजपचा पराभव जाला. त्यानंतर युतीची सत्ता येताच डॉ. पाटील यांना राज्यमंत्रिपदाची भेट मिळाली. त्यावरून स्थानिक स्तरावर तीव्र नाराजीही व्यक्त झाली. सलग पाच वर्षे मंत्रिपद उपभोगल्यानंतर डॉ.पाटील विधानसभेसाठी पुन्हा इच्छुक आहेत.

शिवसेनेचे आमदार गोपीकिशन बाजोरिया यांनी अकोट विधानसभा मतदारसंघातून लढण्याची तयारी केली आहे.  परभणी-हिंगोली स्थानिक स्वराज्य मतदारसंघातून त्यांनी पुत्र विप्लव बाजोरिया यांनाही निवडून आणत आपले राजकीय वजन वाढवले. मात्र, बाजोरियांना मंत्रिपदाने कायम हुलकावणी दिली. त्यामुळे मंत्रिपदावरील दावा मजबूत करण्यासाठी ते विधानसभेच्या रणांगणात उतरण्यास उत्सुक आहेत. गत निवडणुकीत युती तुटल्यानंतर बाजोरियांनी ऐनवेळी अकोला पूर्वमधून निवडणूक लढवत ३६ हजार मते घेतली होती. अकोटसाठी शिवसेनेमध्ये इच्छुकांची गर्दी असून, बाजोरियांमुळे स्पर्धा वाढली आहे.

अमरावती जिल्हय़ात माजी राज्यमंत्री आमदार प्रवीण पोटे तिवसा मतदारसंघातून निवडणूक लढण्याची शक्यता आहे. त्या ठिकाणी भाजपकडे इच्छुकांची मोठी संख्या आहे. मुख्यमंत्र्यांनी पोटेंना तिवसामधून लढण्याचे निर्देश दिल्याची चर्चा आहे. मंत्रिमंडळाच्या शेवटच्या विस्तारात डॉ. अनिल बोंडे यांची कृषिमंत्रिपदी वर्णी लागली, तर पोटे यांना मंत्रिमंडळातून डच्चू मिळाला. आता विधानसभा लढण्याचे पोटेंचे लक्ष्य असेल. अमरावती जिल्हय़ात भाजपमध्ये मोठय़ा प्रमाणात मतभेद आहेत. पांडुरंग फुंडकर यांच्या निधनाने रिक्त झालेल्या जागेवर विधान परिषदेत वर्णी लागलेले आमदार अरुण अडसडही इच्छुक आहेत. चांदूर रेल्वे मतदारसंघातून स्वत: किंवा पुत्र धामणगाव रेल्वेचे नगराध्यक्ष प्रताप अडसड यांना निवडणूक रिंगणात उतरवण्यासाठी त्यांचे प्रयत्न सुरू आहेत. गत निवडणुकीत मोदी लाटेत व नरेंद्र मोदींची चांदूरमध्ये सभा होऊनही अडसडांचा पराभव झाला. विधान परिषदेवर पाठवून भाजपने त्यांचे पुनर्वसन केले. यवतमाळ स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करणारे जलसंधारणमंत्री तानाजी सावंतही उस्मानाबाद जिल्हय़ातून विधानसभा लढणार असल्याची चर्चा मध्यंतरी होती.

विकासकामांच्या आधारावर गतवेळी अकोला पूर्वमधून लढलो. आता अकोटच्या स्थानिक लोकप्रतिनिधींचा त्या ठिकाणावरून लढण्यासाठी आग्रह आहे. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आदेश दिल्यास निवडणूक लढणार आहे.

– गोपीकिशन बाजोरिया, शिवसेना आमदार