कोल्हापूर : वंचित बहुजन आघाडीला भाजप आर्थिक अथवा अन्य कोणत्याही मार्गाने मदत करत असल्याचा काँग्रेस-राष्ट्रवादीचा प्रचार चुकीचा आहे. दोन्ही काँग्रेसला जनतेने मते देणे बंद केल्यामुळे हे दोन्ही पक्ष सध्या सैरभैर झाले असून त्यातून ते आमच्यावर वाटेल ते आरोप करत असल्याची टीका, अ‍ॅड. अण्णाराव पाटील यांनी पत्रकार परिषदेत व्यक्त केली.

कोल्हापूर जिल्ह्यात विविध विधानसभा मतदार संघांमध्ये वंचित बहुजन आघाडीचे ९ उमेदवार निवडणूक रिंगणात असून वंचित बहुजन आघाडीने जाहीरनामा प्रसिद्ध केला आहे. या वेळी अण्णाराव पाटील म्हणाले, की वंचित बहुजन आघाडीला भाजपाची मदत असल्याचा आरोप काँग्रेस-राष्ट्रवादी करत आहे. खरे तर वंचितने राज्यात सर्वच ठिकाणी तर जिह्यत ९ ठिकाणी उमेदवार उभे केले असून हे सर्वच उमेदवार चळवळीतील असून सर्वसामान्य आहेत. यामुळे वंचित आघाडीवर विरोधक खोटे आरोप करीत आहेत. वास्तविक दोन्ही काँग्रेसने जनतेचा पाठिंबा गमावला आहे. लोकांनी त्यांना मते देणे बंद केलेले आहे. त्यांच्या आजवरच्या भ्रष्ट कारभारामुळे लोकांनीच त्यांना दूर लोटले आहे. आता लोक त्यांना मते देत नसल्यामुळे त्याचे खापर ते आमच्यावर फोडतआरोप करत सुटले आहेत.

‘वंचित’ सत्तेत आल्यास राबवायचा सर्व अजेंडा डॉ. प्रकाश आंबेडकर यांनी तयार केला आहे. सध्या बेरोजगारीचा प्रश्न भेडसावत आहे. राज्यामध्ये पोलीस विभागात भरती, कौशल्य विकासावर आधारित अभ्यासक्रम करणाऱ्या तरूणांना बिनव्याजी ५ लाख रूपयापर्यंतचे कर्ज देण्यात येणार आहे. देशावर व राज्यावर कर्ज आहे. कर्ज दूर करण्यासाठीचा आराखडाही तयार असल्याचे त्यांनी सांगितले.