महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीचा प्रचार रंगात आला आहे. भाजपाकडून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांच्या तोफा धडाडत आहे. पण या सर्वांमध्ये केंद्रीय मंत्री नितीन गडकरी कुठे दिसत नाहीत. भाजपाच्या मोठया जाहीर सभांमध्ये त्यांची अनुपस्थिती प्रकर्षाने जाणवतेय. मोदींच्या बरोबरीने नितीन गडकरी यांचे नाव पंतप्रधानपदाच्या उमेदवारीसाठी घेतले जायचे. आता त्याचीच किंमत गडकरी कुठेतरी चुकवतायत असे दिसते. मुंबई मिररने हे वृत्त दिले आहे.

नितीन गडकरी हे भाजपाचे महाराष्ट्रातील मोठे नेते आहेत. पण त्यांना निवडणुकीसंदर्भातील निर्णय प्रक्रियेपासून भाजपाने दूर ठेवल्याचे चित्र आहे. सात ऑक्टोंबरपासून राज्यात प्रचाराला सुरुवात झाली. तेव्हापासून नितीन गडकरींनी २५ सभा घेतल्या आहेत. पण त्यांच्या सर्व सभा विदर्भात झाल्या. विदर्भात विधानसभेच्या ६२ जागा आहेत. मागच्या महिन्यात नाशिकमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या महाजनादेश यात्रेचा समारोप झाला. त्यावेळी मंचावर पंतप्रधान नरेंद्र मोदींसोबत गडकरी दिसले नाहीत तसेच भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांच्या सभेमध्येही गडकरी यांची अनुपस्थिती प्रकर्षाने जाणवली.

तिकीट वाटपामध्ये त्यांचे समर्थक चंद्रशेखर बावनुकळे यांचे तिकीट कापण्यात आले. राज्याचे अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार हे सुद्धा गडकरींचे निकटवर्तीय वर्तुळातील म्हणून ओळखले जातात. पण त्यांच्याकडे सुद्धा महत्वाची जबाबदारी देण्यात आलेली नाही. मोदी यांच्या दुसऱ्या कार्यकाळापासून गडकरी यांचे पंख छाटण्यास सुरुवात झाली. मोदी सरकारच्या पहिल्या कार्यकाळात गडकरी यांच्याकडे तीन महत्वाच्या मंत्रालयांची जबाबदारी होती. गडकरींच्या दृष्टीने महत्वाच्या असलेली मोटार वाहन कायद्याची अंमलबजावणीही टाळण्याचा प्रयत्न झाला.

गडकरींनी वाहतुकीला शिस्त लागावी म्हणून मोटार वाहन कायद्यात कठोर तरतुदी केल्या होत्या. वाहतूक नियम मोडणाऱ्यांवर मोठया रक्कमांचे दंड आकारण्याची तरतूद होती. पण गुजरात आणि महाराष्ट्र या दोन भाजपाशासित राज्यांनीच अंमलबजावणीला नकार दिला. त्यात गुजरात हे पंतप्रधान नरेंद्र मोदींचे गृहराज्य आहे. २०१४ साली महाराष्ट्रात भाजपाची सत्ता येणार हे स्पष्ट झाल्यानंतर देवेंद्र फडणवीसांच्या बरोबरीने मुख्यमंत्रीपदासाठी नितीन गडकरी यांचे नाव सुद्धा चर्चेत होते. पण पंतप्रधान मोदी-शाहंची पहिली पसंती देवेंद्र फडणवीस होते.