गिरीश कुलकर्णी

* या निवडणुकीत मुख्य मुद्दे कोणते?

विधानसभा निवडणुकीतील मुद्दे हे मतदारसंघनिहाय असले पाहिजेत. स्थानिक पातळीवरचे प्रश्न आणि सकल राज्य म्हणून असलेले प्रश्न अशा दोन भागांमध्ये त्यांची विभागणी करायला हवी. विकासाचा प्रादेशिक असमतोल आपण वर्षांनुवर्षे पाहत आहोत. ग्रामीण भागातून शहरांकडे होणारे स्थलांतर, बकाल होणारी शहरे, व्यवसायाच्या पुरेशा संधींचा अभाव हे मुद्दे सातत्याने पुढे येत आहेत. त्यामुळे राज्याचा शाश्वत विकास होताना दिसत नाही. नव्या संकल्पना, नव्या प्रेरणा आणि नवा उत्साह मिळेल असे वातावरण सध्या नक्कीच नाही. चांगले शिक्षण, आरोग्य आणि रोजगार हे मुद्दे महत्त्वाचे आहेत. त्यासंदर्भात उमेदवार आणि संबंधित पक्षांनी केलेल्या घोषणांकडे लक्ष देऊन मतदान करायला हवे. मतदारांना मिळणाऱ्या सोयी-सुविधा, परिसर विकास, लोकशिक्षण आणि लोकसहभागाचे महत्त्व जाणणाऱ्या पात्र आणि योग्य उमेदवारांना मतदान करावे.

* या मुद्दय़ांना राजकीय पक्ष भिडतात असे वाटते का?

राज्यापुढे सध्या असलेल्या मुद्दय़ांना राजकीय पक्ष भिडत नाहीत. मागून आलेली धोरणे पुढे चालविण्यात धन्यता मानण्याची वृत्ती जाणवते. सर्वंकष आणि मुळापासून नव्या योजना आखून त्यांची अंमलबजावणी होताना दिसत नाही. त्याला एखादा अपवाद असू शकेल. एकूणच वैचारिक दारिद्रय़ सर्वच पातळ्यांवर आहे.

* तुम्ही उमेदवार असता तर प्राधान्य कशाला दिले असते?

ज्या मतदारसंघातून निवडणूक लढवायची आहे तेथील मतदारांची वयोगटानुसार, आर्थिक स्तरानुसार विभागणी केली असती. मतदारांच्या गरजा आणि त्यांच्या अपेक्षा यांची दखल घेऊन त्यांचा प्रतिसाद जाणून घेणारी यंत्रणा उभी करणे महत्त्वाचे वाटते.

* नवमतदारांना काय संदेश द्याल?

कोणाला मतदान करावे हा नवमतदारांना पेचात पाडणारा प्रश्न आहे. कोणत्याच पक्षामध्ये आता वैचारिकता उरलेली नाही. त्यामुळे आपल्या मतदारसंघाचा विकास कोण करू शकेल, असा स्वार्थी विचार डोळ्यासमोर ठेवून मतदान करावे लागते. त्यामुळे उमेदवाराची विचारक्षमता आणि कार्यक्षमता याचा धांडोळा घेऊन मतदान करणे योग्य ठरेल.

* प्रचारात कोणत्या गोष्टी टाळायला पाहिजेत असे वाटते?

प्रचारामध्ये आगामी पाच वर्षांत काय करणार, कोणते नवे कार्यक्रम, नव्या योजना आणि विकासाचे प्रकल्प आहेत यावर भर दिला पाहिजे. पण, सध्या ‘त्यांनी काय चूक केली आणि इतक्या वर्षांत देशाचे कसे वाटोळे केले’ या विषयाभोवती प्रचार फिरताना दिसत आहे. फोलपट आश्वासने देण्यापेक्षा व्यावहारिक पातळीवर प्रश्नांचे परिशीलन होईल असे पाहावे. मात्र, असे होत नाही हे आपल्या लोकशाहीच्या अपरिपक्वतेचे लक्षण आहे. उमेदवारांची पळवापळवी सामान्य मतदारांमध्ये निराशा उत्पन्न करणारी आहे.

(संकलन- विद्याधर कुलकर्णी)