राज्यातील सत्तेचं कोड सुटण्याच्या मार्गावर आहे. सोमवारी दिवसभर चर्चेत गुंतलेल्या काँग्रेस अखेर सरकार स्थापन करण्यासाठी शिवसेनेला पाठिंबा देण्यास तयार झाली आहे. काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांनी ही माहिती दिली आहे. सत्ता स्थापन करण्यासाठी शिवसेनेला पाठिंबा देण्यास काँग्रेस तयार असल्याचं त्यांनी म्हटलं आहे.

विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर तीन आठवडे लोटले तरी सत्ता स्थापनेचा गुंता सुटलेला नाही. मुख्यमंत्रीपदावर ठाम असलेल्या शिवसेनेकडून भाजपाशी काडीमोड घेतल्यानंतर सत्ता स्थापन करण्याचा प्रयत्न सुरू आहे. भाजपानं सरकार स्थापन करण्यास असमर्थता दर्शवल्यानंतर शिवसेनेला आमंत्रण मिळालं होत. मात्र, वेळेत पाठिंबा न दिल्यानं शिवसेनेला सत्ता स्थापनेचा दावा करता आला नाही.

आणखी वाचा- महाराष्ट्रात सत्ता स्थापनेसंबंधी मल्लिकार्जून खर्गे यांचे महत्वपूर्ण विधान

दरम्यान, वैचारिक मतभेद असलेल्या काँग्रेस आणि शिवसेना राज्यात एकत्र येत सरकार स्थापन करणार आहे. तसे संकेत काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांनी दिले आहे. ठाकरे म्हणाले, “शिवसेनेला पाठिंबा देण्यासंदर्भा काँग्रेस आणि राष्ट्रवादीकडून दिवसभर चर्चा करण्यात आली. काँग्रेसच्या बैठकीत शिवसेनेसोबत जाण्याचे जवळपास निश्चित झाले असून, काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना यांच्यात समानसूत्री कार्यक्रम घेऊन बैठक होईल. त्यातून पुढील निर्णय घेऊ, असं माणिकराव ठाकरे यांनी सांगितलं.

आणखी वाचा- अनुभवी सरकारसाठी काँग्रेसचा मुख्यमंत्री व्हावा : आशिष देशमुख

विधानसभा निवडणुकीचे निकाल लागल्यानंतर महाराष्ट्रात फक्त बैठकांचा धडाका सुरू आहे. सर्वात मोठा पक्ष असलेल्या भाजपाला राज्यपालांनी सत्ता स्थापन करण्यासाठी आमंत्रण दिलं होतं. भाजपानं सरकार स्थापन करण्यास असमर्थता दर्शवल्यानंतर राज्यपालांनी शिवसेनेला आमंत्रण दिलं. शिवसेनेनं राष्ट्रवादी आणि काँग्रेसला सोबत घेण्याचा प्रयत्न केला पण दोन्ही काँग्रेसनी वेळेत निर्णय न घेतल्यानं शिवसेनेला दावा करता आला नाही. आता राज्यपालांनी राष्ट्रवादी काँग्रेसला सत्ता स्थापनेचं आमंत्रण दिलं आहे. पण, बहुमतासाठी लागणारा आकडा काँग्रेसला सोबत घेऊन राष्ट्रवादीला जमवता येणार नाही, असं आता राष्ट्रवादीकडूनच सांगितलं जात आहे.