08 March 2021

News Flash

“शिवसेनेचाच मुख्यमंत्री होणार”, काँग्रेस नेत्याने व्यक्त केला विश्वास

पाठिंब्यावरून काँग्रेसमध्ये झालेल्या घोळाचा शिवसेनेला फटका बसला आणि तोंडघशी पडावे लागले

सरकार स्थापण्यासाठी काँग्रेसचा पाठिंबा गृहीत धरून शिवसेनेने सोमवारी सायंकाळी सरकार स्थापन करण्याचा दावा राज्यपालांकडे केला, पण मुदतीत काँग्रेसकडून पत्रच प्राप्त झाले नाही. पाठिंब्यावरून काँग्रेसमध्ये झालेल्या घोळाचा शिवसेनेला फटका बसला आणि तोंडघशी पडावे लागले. मात्र यानंतरही राज्यात शिवसेना-काँग्रेस आणि राष्ट्रवादीचं एकत्रित सरकार स्थापन होईल आणि शिवसेनेचा मुख्यमंत्री शपथ घेईल असा विश्वास काँग्रेस नेते आणि आमदार कागडा चांड्या पाडवी यांनी व्यक्त केला आहे.

कागडा चांड्या पाडवी हे काँग्रसचे नंदुरबारमधील अक्कलकुवा मतदारसंघातील आमदार आहेत. शिवसेनेच्या उमेदवाराचा पराभव करत सलग दुसऱ्यांदा ते आमदारपदी निवडून आले आहेत. “सत्ता स्थापनेची प्रक्रिया अद्याप सुरु असून, निकाल सकारात्मक असेल. वैयक्तिकरित्या मला तिन्ही पक्ष एकत्र येऊन सरकार स्थापन करतील आणि शिवसेनेचा मुख्यमंत्री होईल,” असं आमदार कागडा चांड्या पाडवी यांनी म्हटलं आहे.

राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या पाठबळावर सत्ता स्थापन करण्याचा दावा सोमवारी शिवसेनेने राज्यपालांकडे केला असला तरी १४५ सदस्यांच्या पाठिंब्याचे पत्र सादर करण्यास पक्षाला अपयश आले. पत्र सादर करण्यास मुदतवाढ देण्याची शिवसेनेची मागणी फेटाळून राज्यपालांनी तिसऱ्या क्रमांकावरील राष्ट्रवादी काँग्रेसला सरकार स्थापन करण्याची संधी दिली. यामुळे सत्ता स्थापनेचा घोळ सुरूच असून, राज्याची राष्ट्रपती राजवटीकडे वाटचाल सुरू आहे.

काँग्रेस व राष्ट्रवादीच्या पाठिंब्याने सरकार स्थापन करायचे, असा शिवसेनेचा प्रयत्न होता. यातूनच शिवसेनेने केंद्रातील सरकारमधून बाहेर पडावे, अशी अपेक्षा राष्ट्रवादी व काँग्रेसने व्यक्त केली होती. यानुसार केंद्रीय अवजड उद्योगमंत्री अरविंद सावंत यांनी मंत्री पदाचा राजीनामा दिला. सरकार स्थापण्याबाबत राष्ट्रवादीचे पक्षाध्यक्ष शरद पवार आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यात चर्चाही झाली. काँग्रेसच्या कार्यकारी समितीच्या बैठकीत शिवसेनेबरोबर हातमिळवणी करण्यास विरोध झाला होता. पण राज्यातील नेत्यांची तीव्र भावना लक्षात घेता, पुन्हा बैठक बोलाविण्यात आली.

काँग्रेसने सुमारे साडेतीन तासांच्या बैठकीनंतरही काहीच निर्णय घेतला नाही. काँग्रेसकडून पाठिंब्याचे पत्र प्राप्त होईल, अशी चर्चा सुरू झाली. साडेसातपर्यंत राज्यपालांनी शिवसेनेला मुदत दिली होती. शिवसेना नेते पावणेसात वाजता राजभवनवर पोहोचले. पण काँग्रेसकडून पाठिंब्याचे पत्रच प्राप्त झाले नाही. काँग्रेस व राष्ट्रवादीचा पाठिंबा गृहीत धरून शिवसेनेने सरकार स्थापण्याचा दावाही केला होता. पण पाठिंब्याचे पत्र सादर करू शकले नाहीत.

काँग्रेसची बैठक रात्री आठपर्यंत सुरू होती. काँग्रेसने पाठिंब्याबाबत वेळेत पत्रच दिले नाही. काँग्रेसचे पत्र न आल्याने राष्ट्रवादीनेही राज्यपालांना पत्र दिले नाही. मित्र पक्षांनी तत्त्वत: मान्यता दिली असली तरी पत्र नंतर सादर करू, असे शिवसेनेच्या वतीने राज्यपालांना विनंती करण्यात आली. पण राज्यपालांनी पत्र सादर करण्यास मुदतवाढ देण्यास नकार दिला.

काँग्रेस व राष्ट्रवादीकडून पत्र प्राप्त न झाल्याने १४५ पेक्षा जास्त सदस्यांच्या पाठिंब्याचे पत्र शिवसेना सादर करू शकली नाही. सरकार स्थापण्याची तयारी केलेल्या सेनेच्या अपेक्षांवर यातून पाणी फिरले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 12, 2019 11:16 am

Web Title: maharashtra politcial crisis congress mp kagda chandya padvi shivsena ncp sgy 87
Next Stories
1 अरविंद सावंत यांचा राजीनामा राष्ट्रपतींकडून मंजूर
2 राष्ट्रवादीच्या बैठकीआधी शरद पवार लिलावतीमध्ये, रोहित पवारांसह घेतली संजय राऊतांची भेट
3 शिवसेनेच्या समर्थनावरून आघाडीतच जुंपली
Just Now!
X