शिवसेना-भाजपा युतीने विधानसभा निवडणूक एकत्र लढवली असली तरी शिवसेनेला उपमुख्यमंत्रीपद देण्याचा कोणताही शब्द दिलेला नाही असे भाजपाचे महाराष्ट्र प्रभारी आणि पक्षाचे सरचिटणीस भूपेंद्र यादव यांनी स्पष्ट केले आहे. विधानसभा निवडणुकीसाठी भूपेंद्र यादव यांची प्रभारीपदी नियुक्ती करण्यात आली होती. शिवसेनेला उपमुख्यमंत्रीपद देण्याबाबत मुख्यमंत्री देवेद्र फडणवीस ठरवतील असे यादव यांनी सांगितले. मुंबई मिररने हे वृत्त दिले आहे.

विधानसभा निवडणुकीच्याआधी जागा वाटप आणि मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्रीपदावरुन दोन्ही पक्षांमधील मतभेद समोर आले होते. त्यादृष्टीने भूपेंद्र यादव यांचे विधान महत्वपूर्ण आहे. काल मतदान संपल्यानंतर जाहीर झालेले एक्झिट पोलचे आकडे शिवसेना-भाजपा युतीला सुखावणारे असून काँग्रेस, राष्ट्रवादी, मनसेची निराशा करणारे आहेत. एक्झिट पोलनुसार भाजपा-शिवसेना युतीला स्पष्ट बहुमत मिळणार आहेत.

बहुतांश एक्झिट पोल्सनी २०० पेक्षा जास्त जागा मिळण्याचा अंदाज वर्तवला आहे. २०१४ साली शिवसेना, भाजपा स्वतंत्रपणे निवडणूक लढले होते. त्यानंतर यावर्षी लोकसभा निवडणुकीच्यावेळी दोन्ही पक्षांची पुन्हा युती झाली. राज्याच्या हितासाठी आम्ही पुन्हा एकत्र आलो आहोत असे भूपेंद्र यादव यांनी सांगितले. विचारधारेसह आमच्या सर्व गोष्टी जुळतात. आम्हाला महाराष्ट्राच्या हिताची काळजी आहे असे यादव यांनी सांगितले. आदित्य ठाकरे यांच्या विधानसभा निवडणूक लढवण्याचेही त्यांनी कौतुक केले. भाजपाचे वरिष्ठ नेते आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना तिकीट वाटपासून दूर ठेवल्याचा दावाही त्यांनी फेटाळून लावला. हे संपूर्णपणे चुकीचे आहे. गडकरींसह सर्वांना सामावून घेण्याचा आम्ही प्रयत्न केला असे भूपेंद्र यादव म्हणाले.