Maharashtra Vidhan Sabha Election 2019 Voting Updates : संपूर्ण देशाचे लक्ष लागलेल्या राज्य विधानसभा निवडणुकीसाठी आज मतदान होत आहे. पावसामुळे राज्यातील अनेक भागांत कोसळणाऱ्या निवडणूक यंत्रणांना रविवारी दिवसभर तारेवरची कसरत करावी लागली. मात्र त्यांच्या कर्तव्यदक्षतेमुळे राज्यातील ३,२३७ उमेदवारांबद्दल मतदान प्रक्रीया पार पडत आहे. त्या साऱ्यांचे भवितव्य आज ठरणार आहे.

लोकशाहीच्या उत्सवात सहभागी होत नक्की मतदान करा असे सगळीकडून सांगितले जात आहे. या दरम्यान भारताचा माजी क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर याने मतदानाचा हक्क बजावला. त्याची पत्नी अंजली आणि मुलगा अर्जुन तेंडुलकर यांच्यासह वांद्रे येथे त्याने मतदानाचा हक्क बजावला. मतदानाचा हक्क बजावल्यानंतर त्याने इतर मतदारांनाही मतदान करण्याचे आवाहन केले. “मतदान करणे आपल्या सर्वांचे कर्तव्य आहे. माझं मत मी नोंदवलं आहे, आपण सर्व सुद्धा मतदान करून या लोकशाहीच्या सोहळ्याचा भाग व्हा”, असे ट्विट करत मोलाचा संदेश दिला.

दरम्यान, राज्य विधानसभेच्या २८८ जागा तर सातारा लोकसभा पोटनिवडणुकीसाठी सोमवारी सकाळी ७ ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत मतदान होत आहे. राज्यात ८ कोटी ९८ लाख ३९ हजार ६०० मतदार आहेत. मतदान निर्विघ्नपणे पार पाडण्यासाठी निवडणूक यंत्रणा सज्ज असून सर्वत्र चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.

९६ हजार मतदान केंद्रे

मतदानासाठी निवडणूक यंत्रणा सज्ज झाली असून राज्यात ९५,४७३ मुख्य तर १,१८८ सहाय्यक अशी एकूण ९६ हजार ६६१ मतदान केंद्रे उभारण्यात आली आहेत. चार कोटी ६८ लाख ७५ हजार, ७५० पुरुष तर चार कोटी २८ लाख ४३ हजार ६३५ असे एकूण आठ कोटी ९८ लाख ३९ हजार ६०० मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत. यावेळी दोन हजार ६३४ तृतीयपंथी, तीन लाख ९६ हजार अपंग आणि एक लाख १७ हजार ५८१ सर्व्हिस मतदारांना मतदानाचा हक्क बजावण्यासाठी सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.