शिवसेनेच्या मुख्यमंत्रिपदाच्या प्रस्तावाचा भाजपने गांभीर्याने विचार करावा, असा सल्ला केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी दिला आहे. ते प्रसारमाध्यमांशी बोलत होते. शिवसेनेच्या अडीच-अडीच वर्षे मुख्यमंत्री पदाच्या प्रस्तावाचे यावेळी त्यांनी समर्थन केलं. जनतेने महायुतीला कौल दिला आहे. शिवसेनेशिवाय सत्तास्थापन करणे महायुतीला अशक्य आहे. त्यामुळे भाजपाने शिवसेनेच्या प्रस्तावाचा गंभीरपणे विचार करावा, असेही आठवले यांनी पुढे नमूद केले.

रामदास आठवले यांनी यावेळी सत्तास्थापनेसाठी नवे समीकरण होणार नसल्याचेही सांगितलं. शिवसेना कधीही काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीसोबत जाणार नाही, असा विश्वासही आठवले यांनी व्यक्त केला. अडीच-अडीच वर्षे मुख्यमंत्री हा प्रस्ताव जर मान्य नसेल तर शिवसेनेला उपमुख्यमंत्री आणि राज्यात दोन-तीन जास्त मंत्रिपदे द्यावी तसेच केंद्रातही जास्तीच मंत्रिपद द्यावं व हा तीढा सोडवावा असा सल्लाही यावेळी आठवलेंनी दिला. सत्तास्थापनेबाबत महायुतीने ४-५ दिवसांत निर्णय घेण्याची आवश्यकता आहे, असेही आठवले यांनी पुढे नमूद केले.

महाराष्ट्रामध्ये १०५ जागांसह भाजपा क्रमांक एकचा पक्ष ठरला. तर ५६ जागांसह शिवसेना दुसऱ्या आणि ५४ जागांसह राष्ट्रवादी तिसऱ्या क्रमांकावर आहे. महाराष्ट्रामध्ये आता सत्ता स्थापनेच्या प्रक्रियेला आता वेग आला असून पक्षांच्या बैठका सुरू झाल्या आहेत. महायुतीचं सरकार येणार हे निश्चित मानले जाते मात्र, शिवसेनेला अडीच वर्षांसाठी मुख्यमंत्रीपद मिळणार का? की शिवसेना कुठल्या वाटाघाटीवर भाजपाला टेकू देणार. अथवा मुख्यमंत्रीपदासाठी राज्यात सत्तेची नवी समीकरणं आखणार. हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.