आमदार बच्चू कडू यांनी काही दिवसांपूर्वी शिवसेनेला पाठिंबा जाहीर केला होता. परंतु काही कालावधीनंतर शिवसेना भाजपाची युती तुटली. दरम्यान, बच्चू कडू यांनी सरकारलाच पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला आहे. मंत्रिमंडळ विस्तारात खातं मिळाल्यास चांगलं काम करून दाखवेन, असं बच्चू कडू म्हणाले.

मंत्रिमंडळाच्या विस्तारादरम्यान कोणतंही खातं मिळाल्यास उत्तम काम करून दाखवेन, माझ्या मनात मंत्री होण्याची इच्छा आहे. गावात कोण संरपंचपदही सोडत नाहीत, असं बच्चू कडू म्हणाले. आम्हाला मंत्रिपद मिळालं आणि त्यानं जर लोकांचं भलं होत असेल तर काय हरकत आहे. तसंच जर मंत्रिपद मिळून जर लोकांची भलं होत नसेल तर अशा मंत्रिपदाचा उपयोग तरी काय? असा सवाल त्यांनी यावेळी केला.

लोकांच्या हितासाठी काही करता यावं यासाठी मला मंत्रिपदाची अपेक्षा आहे. सरकारची धोरणं आणि जनतेच्या हितांमध्ये समानता असली पाहिजे, असंही कडू यावेळी म्हणाले. गुरूवारी राज्यातील महाविकास आघाडीच्या मंत्र्यांचा शपथविधी सोहळा पार पडला. यावेळी उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रिपदाची, तर काँग्रेस, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रत्येकी दोन आमदारांनी मंत्रिपदाची शपथ घेतली होती.