संजय बापट, मुंबई

विविध राजकीय पक्ष आणि अपक्षांचे मिळून पाच-दहा नव्हे तर तब्बल शंभराहून अधिक पाटील आपले राजकीय भाग्य अजमावण्यासाठी विधानसभा निवडणुकीच्या रणांगणात उतरले आहेत. त्याचप्रमाणे राजकीय पटलावरील पवार, जाधव, देशमुख अशी आणखी काही घराण्यातील व्यक्ती राजकीय आखाडय़ात शड्डू ठोकून उभे आहेत.

या निवडणुकीत सर्वाधिक उमेदवार आहेत ते ‘पाटील’ घराण्याचे.  पाटील आडनावाचे या वेळी तब्बल ११३ सर्वपक्षीय उमेदवार निवडणुकीसाठी उभे आहेत. त्यामध्ये भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील,  गृहनिर्माणमंत्री राधाकृष्ण विखे पाटील, राज्यमंत्री गुलाबराव पाटील, राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, माजी विधानसभा अध्यक्ष दिलीप वळसे- पाटील,  हर्षवर्धन पाटील, सुमन पाटील आदींचा  समावेश आहे. विशेष म्हणजे तासगाव विधानसभा मतदारसंघात माजी मंत्री स्वर्गीय आर.आर.(आबा) पाटील यांच्या पत्नी सुमन या उभ्या असून तेथे मतदारांमध्ये संभ्रम निर्माण करून विरोधकांनी  सुमन पाटील यांच्याशी नामसाधर्म्य असलेल्या सुमन रावसाहेब(आबा) पाटील यांना मैदानात उतरविले आहे. राजकारणात आणखी एक घराणे नेहमीच चर्चेत असते ते म्हणजे पवारांचे. या वेळी माजी उपमुख्यमंत्री अजित पवार, त्यांचा पुतण्या रोहित पवार यांच्यासह ३५ उमेदवार पवार अडनावाचे आहेत.  तर अनिल देशमुख, आशीष देशमुख, अमित देशमुख असे ३० देशमुख, जाधव अडनावाचे ५२, शेख अडनावाचे ७८, भोसले अडनावाचे १२ उमेदवारही निवडणुकीच्या माध्यमातून  भाग्य अजमावत आहेत.