“आपण कोण आहोत, आपली औकात काय, आपण (पवार) साहेबांबद्दल बोलतोय याचेही भान शिवतारेंना नव्हते. त्यामुळेच लोकसभेच्या प्रचारादरम्यान शेवटच्या सभेत मी त्यांना पुन्हा निवडून कसे येता अशा इशारा दिला होता,” असं स्पष्टीकरण राज्याचे माजी उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी दिले आहे. विधानसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान अनेक नेत्यांनी एकमेकांवर आरोप प्रत्यारोप केले. मात्र या आरोपांबरोबरच लोकसभा निवडणुकीच्या वेळी राष्ट्रवादीचे नेते आणि राज्याचे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शिवसेनेचे नेते विजय शिवतारे यांना दिलेला एक इशारा चर्चेत आला होता. याच जुन्या वक्तव्यावर आता अजित पवार यांनी स्पष्टीकरण दिले आहे.

विधानसभा निवडणुकीमध्ये पुरंदरमध्ये शिवसेनेला मोठा धक्का बसला आहे. काँग्रेसच्या संजय जगताप यांनी शिवसेनेचे मंत्री विजय शिवतारे यांचा पराभव केला. या निकालानंतर अजित पवार यांनी शिवतारे यांना लोकसभेच्या प्रचारादरम्यान दिलेल्या धमकीची पुन्हा चर्चा होऊ लगाली. याचसंदर्भात पवार यांना प्रश्न विचारला असता त्यांनी याबद्दलची माहिती दिली. “शिवतारे हे आधी राष्ट्रवादीमध्ये होते. त्यानंतर त्यांनी पक्षाला सोडचिठ्ठी देत शिवसेनेत प्रवेश केला. कोणी कोणत्या पक्षात जावे हा ज्याचा त्याचा प्रश्न असतो. मात्र राजकीय टीका करताना एका मर्यादेचे भान ठेवणे गरजेचे असते. शिवतारे अनेकदा सुप्रिया सुळे असो किंवा शरद पवार असो यांच्याबद्दल नको त्या शब्दात बोलले. राजकीय आणि वैचारिक विरोध असू शकतो पण आपण कोण आहोत, आपली औकात काय, आपण साहेबांबद्दल बोलतोय याचेही भान शिवतारेंना नव्हते. त्यामुळेच लोकसभेच्या प्रचारादरम्यान शेवटच्या सभेमध्ये मी त्यांना पुन्हा निवडून कसे येता हेच बघतो असा इशारा दिला होता. आणि तो इशारा आता जनतेने मतपेटीतून खरा करुन दाखवला. शेवटी मतदार ठरवतो कोणाला निवडून द्यायचे. त्यामुळेच त्यांनी केलेल्या निवडीमुळे तो इशारा खरा ठरला,” असं मत अजित पवारांनी व्यक्त केले आहे.

दरम्यान, पुरंदरमध्ये बंडखोरी होऊ द्यायची नाही यासाठी आपण विशेष प्रयत्न केल्याचेही पवार यांनी सांगितले. “बंडखोरी होऊ द्यायची नाही असं मी सर्व नेत्यांना बजावलं होतं. बंडखोरीचा फायदा इतरांना होतो असंही मी त्यांना सांगितलेलं. त्याप्रमाणे काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या स्थानिक नेत्यांनी एकत्र काम केल्यानेच पुरंदरमध्ये विजय मिळाला,” असं पवार म्हणाले.

काय म्हणाले होते पवार

काही महिन्यांपूर्वीच लोकसभेच्या निवडणुकाच्या प्रचाराच्या वेळी पवार आणि शिवतारे यांच्या खडाजंगी झाल्याचं पहायला मिळालं होतं. एका सभेदरम्यान अजित पवार यांनी विजय शिवतारे यांना धमकी दिली होती. यावेळी शिवतारे कसे काय आमदार होतात हे बघून घेतो, असं पवार म्हणाले. “शिवतारे तर काय पोपटासारखा मीठू मीठू बोलू लागलाय.. अरे विजय शिवतारे, तुझं बोलणं किती.. तुझा आवाका किती.. तू बोलतोय कोणा बरोबर.. तुला यंदा दाखवतो तू कसा आमदार होतो ते.. बघतो मी..,” अशा शब्दामध्ये पवारांनी शिवतारेंवर निशाणा साधला होता.