” दहा वर्षांपूर्वी विधानसभा निवडणूक २००९ मध्ये तिकिट वाटपावेळी मीच राजेंद्र गुंड आणि दत्तात्राय वारे या दोघांना डावलून राम शिंदे यांना उमेदवारी दिली होती. दहा वर्षानंतर या भागात आल्यावर माझ्याकडून खरंच मोठी चूक झाली होती हे आता जाहीरपणे मान्य करावे लागेल. आज ते दोघेही व्यासपीठावर आहेत. दहा वर्षांत त्यांनी आणि या भागातील जनतेनं जे भोगलं, त्याबद्दल मी त्यांची जाहीर माफी मागतो”, असे म्हणत विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी, “कर्जत-जामखेड मतदारसंघात गेल्या दहा वर्षांपासून असलेला राम हा आता रावण झाला आहे. त्याचे दहन करायची वेळ येत्या एकवीस तारखेला आली आहे,’ असं आवाहन केलं. बुधवारी(दि.१६) राष्ट्रवादी काँग्रेसचे कर्जत-जामखेडचे उमेदवार रोहित पवार यांच्या प्रचारासाठी झालेल्या सभेत त्यांनी भाजपा सरकारविरोधात तुफान टोलेबाजी केली.

जामखेडच्या बाजारतळ परिसरात झालेल्या या सभेत बोलताना मुंडे यांनी मुंडे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शाह यांच्यासह भाजपाचे उमेदवार प्रा. राम शिंदे यांच्यावर टीकेचा भडीमार केला. ‘कर्जत-जामखेड मतदारसंघात येताना हेलिकॉप्टरऐवजी गाडीने यावे. म्हणजे इथं नेमका किती विकास झालाय, ते कळेल,’ असा सल्ला त्यांनी अमित शाह यांना दिला. ‘ त्यांचे वय ५४ वर्षे आहे आणि ते पवार साहेबांनी ७० वर्षांत काय केले हे विचारतायेत,’ असा चिमटा देखील त्यांनी काढला. तसंच, ‘राज्यातील शेतकऱ्यांना विहिरी दिल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे सांगत आहेत. मात्र, त्या विहिरी शेतकऱ्यांना आजपर्यंत मिळालेल्या नाहीत. बहुधा या विहिरी गुप्त असून त्या फक्त भाजपावाल्यांनाच दिसत असाव्यात,’ असा टोला मुंडेंनी लगावला.

आणखी वाचा : शिखर बँक घोटाळ्यात रोहित पवारांचेही नाव- किरीट सोमय्या

“भाजपावाले ईडी’ची भीती दाखवून शरद पवारांना संपवायला निघालेत. मात्र, आमच्यासारखे लाखो तरुण मावळे राष्ट्रवादीत आहेत, तोपर्यंत राष्ट्रवादी संपू शकणार नाही. पवार साहेब काय आहेत, हे कळण्यासाठी मोदी आणि शहा यांना दहा जन्म घ्यावे लागतील. पवारांनी महाराष्ट्रात जेवढी विमानतळे उभी केली, तेवढे बस स्टँडही गुजरातमध्ये झालेले नाहीत,’ अशी टीकाही मुंडे यांनी केली.