पहिल्या स्थानावर झेप घेण्याचा प्रयत्न

मधु कांबळे, मुंबई</strong>

पाच वर्षांपूर्वी अल्पमतातील भाजपला हात देऊन सत्तेच्या सिंहासनावर बसवणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेसने आपले संख्याबळ वाढवून त्याच पक्षाला हतबल व्हायची वेळ आणली आहे. या आधी सत्ताधारी पक्ष म्हणून आणि त्यानंतर विरोधी पक्ष म्हणूनही दुसऱ्या क्रमांकावर राहिलेल्या राष्ट्रवादीने आता राज्याच्या राजकारणात केंद्रस्थानी मुसंडी मारली आहे. पुढच्या काळात काँग्रेससोबत आघाडी करूनही सत्तेच्या राजकारणात पहिल्या स्थानावर राहण्याचा प्रयत्न राष्ट्रवादीचा राहील, असे मानले जात आहे.

मागील पाच वर्षांपूर्वी सत्तेत असतानाच, काँग्रेसबरोबर बिनसल्याने राष्ट्रवादीने विधानसभा निवडणुकीत सवतासुभा मांडला होता. सत्ताधाऱ्याच्या विरोधातील जनमत आणि मतविभाजनामुळे त्याचा दोन्ही काँग्रेसला फटका बसला व सत्तेतून पायउतार व्हावे लागले.

भाजपने लोकसभा व विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर अनेक बिनीच्या नेत्यांना आपल्या तंबूत आणून राष्ट्रवादीला खिंडार पाडण्याचा प्रयत्न केला. लोकसभा निवडणुकीत तशी राष्ट्रवादीची सुमारच कामगिरी राहिली. त्यामुळे काँग्रेसप्रमाणे राष्ट्रवादीचे नेतेही खचले होते. मात्र पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी पक्षाची सारी सूत्रे आपल्या हाती घेतली आणि संबंध महाराष्ट्र ढव़ळून काढला. शेतकऱ्यांचे प्रश्न, बेरोजगारी आणि सत्तेच्या अरेरावीच्या विरोधात त्यांनी भाजपच्या विरोधात युद्धच पुकारले. भाजपच्या फोडाफोडीच्या राजकारणाचा सर्वाधिक फटका बसलेल्या राष्ट्रवादीने सातारा लोकसभा मतदारसंघातील पोटनिवडणूक आव्हान म्हणूनच स्वीकारले आणि उदयनराजे भोसले यांचा पराभव करून भाजपला मोठा धक्का दिला.

काँग्रेसच्या तुलनेत राष्ट्रवादीकडे नेतृत्वाची दुसरी फळी मजबूत आहे. शरद पवार मैदानात उतरल्यानंतर ही फळीही सक्रिय झाली. जागावाटपात फार घासाघीस न करता काँग्रेसशी जुळवून घेऊन मतविभाजन टाळण्याचा प्रयत्न राष्ट्रवादीच्या पथ्यावर पडला. मागील विधानसभेत राष्ट्रवादीचे ४१ आमदार होते. या वेळी १३ ने ही संख्या वाढून ५४ आमदार झाले आहेत. या निवडणुकीत राष्ट्रवादीला मिळालेली एकूण मते पाहता, या पक्षाने दुसरे स्थान पटकावले आहे. राष्ट्रवादीला ९२ लाख १३ हजार ४५४ मते म्हणजे १६.७१ टक्के मते मिळाली आहेत आणि ती शिवसेनेपेक्षा (९० लाख ३३ हजार ४९४ ) जास्त आहेत. या पूर्वी सत्तेत असताना काँग्रेस पहिल्या स्थानावर व राष्ट्रवादी दुसऱ्या स्थानावर अशी परिस्थिती होती. राष्ट्रवादीने आता काँग्रेसच्या पुढे मजल मारली आहे. विधान परिषदेबरोबरच आता विधानसभेतील प्रमुख विरोधी पक्ष राष्ट्रवादी असेल, भाजपचा उधळलेला सत्तेचा वारू रोखून राष्ट्रवादीने राज्याच्या राजकारणात केंद्रस्थानी मुसंडी मारली आहे.