शिवसेनेने निवडणूक निकालानंतर नव्या अटी ठेवल्या. अनेकदा प्रचारसभांमध्ये बोललो होतो की देवेंद्र फडणवीस हेच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होतील असं बोललो होतो तेव्हा कुणीही त्यावर आक्षेप का घेतला नाही? असा प्रश्न आता केंद्रीय गृहमंत्री आणि भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांनी विचारला आहे. निवडणुकीच्या पूर्वी ज्या काही प्रचारसभा झाल्या त्यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही देवेंद्र फडणवीस हेच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होतील असं वक्तव्य त्यांनी केलं होतं. देवेंद्र फडणवीस यांनीही अनेकदा हेच वक्तव्य केलं होतं. मीदेखील अनेकदा बोललो होतो तेव्हा कुणीही आक्षेप का घेतला नाही? असा प्रश्न अमित शाह यांनी विचारला.

एवढंच नाही तर राष्ट्रपती राजवट लागू झाल्यावर महाराष्ट्रातले विरोधक टीका करत आहेत की आम्हाला पुरेसा वेळ दिला नाही त्याला काहीही अर्थ नाही ते फक्त राजकारण करत आहेत असाही आरोप शाह यांनी केला. वेळ दिला नाही, संधी दिली नाही याला काहीही अर्थ नाही कारण विरोधीपक्ष यावर राजकारण करत आहेत. १८ दिवस सत्तास्थापनेसाठी कुठेही लागलेले नाही. आता राज्यपालांनी राष्ट्रपती राजवट लागू करुन सहा महिन्यांचा अवधी दिला आहे. ज्यांच्याकडे बहुमत आहे त्यांनी जावं आणि सरकार स्थापन करावं असाही टोला अमित शाह यांनी लगावला.