मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना विश्वास

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

सौरभ कुलश्रेष्ठ, मुंबई</strong>

सत्तेचा वाट्टेल तसा वापर करून पुन्हा सत्ता मिळवायची ही भ्रष्ट राजकीय संस्कृती राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी महाराष्ट्रात तयार केली होती. राजकारणाचा हा ‘पवार पॅटर्न’ या विधानसभा निवडणुकीनंतर राज्यातून बाद होईल, असे भाकीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वर्तविले आहे. या निवडणुकीत फारशी चुरस नसून दोन तृतीयांश बहुमत मिळवून पुन्हा सत्तेत येऊ, असा ठाम विश्वासही त्यांनी व्यक्त  केला.

राज्यातील विधानसभा निवडणुकीच्या पाश्र्वभूमीवर शरद पवार यांच्यासह प्रफुल्ल  पटेल यांच्यावर सुरू झालेली ईडीची कारवाई, प्रचाराचे स्वरूप-त्यातील विधाने, शिवसेना-भाजपमधील सत्तावाटप, आरेमधील कारशेड, राम मंदिराचा खटला अशा विविध विषयांवर मुख्यमंत्री फडणवीस यांनी ‘लोकसत्ता’ला दिलेल्या मुलाखतीमध्ये सविस्तर भाष्य केले.

एखाद्याला राजकारणातून बाद करण्याची भाषा करणे योग्य नाही. मात्र महाराष्ट्राच्या राजकारणात वाट्टेल ते करून सत्ता मिळवायची ही भ्रष्ट संस्कृती तयार झाली होती. सत्तेचा बेदरकार वापर करून पुन्हा सत्ता, असे समीकरण शरद पवार यांनी तयार केले होते. लोकांना ते पसंत नाही. या विधानसभा निवडणुकीनंतर राजकारणाचा हा ‘पवार पॅटर्न’ निकालात निघेल, असे फडणवीस यांना सांगितले. त्यावर आताच्या भाजप सरकारवरही सत्तेचा गैरवापर करून पुन्हा सत्ता मिळवण्याचे प्रयत्न सुरू असल्याचा आरोप होत आहे याकडे लक्ष वेधले असता, आरोप कोणी काहीही करेल पण तसा पुरावा सादर करावा, असे आव्हानच फडणवीस यांनी दिले.

पराभव समोर दिसू लागला की सदसद्विवेकबुद्धी कमी होते. चिडचिड वाढते. पवारांच्या बाबतीत नेमके हेच होत असून पराभव समोर दिसू लागल्याने ते हातवारे करत आहेत. आम्ही जिंकणारे आहोत. जिंकणाऱ्यांनी तसे वागायची गरज नसते, त्यामुळे त्यांच्या प्रत्येक गोष्टीवर प्रतिक्रिया देण्याची गरज नाही, असा टोला फडणवीस यांनी लगावला. शिखर बँक घोटाळ्यात उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार सुरू झालेल्या कारवाईचे-ईडीने सुरू केलेल्या चौकशीचे राजकीय भांडवल करून सहानुभूती मिळवण्याचा प्रयत्न करत आहेत. पण त्यात त्यांना यश मिळणार नाही, असा दावाही मुख्यमंत्र्यांनी केला.

पवारांची कागदपत्रे तपासात पुढे येतील

शिखर बँक घोटाळ्याशी आपला संबंध नाही, आपण कोणालाही पत्र दिलेले नाही, असा दावा शरद पवार करत आहेत. मात्र पवार यांच्या सूचनेनुसार-पत्रानुसार संबंधित संस्थेला कर्ज मंजूर केल्याबाबतचे ठराव आहेत, त्याच्या प्रती आहेत असे माझ्या कानावर आले आहे. तसे असेल तर तपास यंत्रणांच्या चौकशीत ही कागदपत्रे समोर येतील, असे सूचक विधान मुख्यमंत्री फडणवीस यांनी केले.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Pawar pattern will be out after assembly elections cm devendra fadnavis zws
First published on: 19-10-2019 at 01:20 IST