विधानसभा निवडणुकीत प्रचारासाठी ड्रोन आणि स्टार प्रचारकांना पाचारण करण्यासाठी हेलिकॉप्टरचा वापर करण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांची परवानगी बंधनकारक असल्याचे जिल्हा प्रशासनाने स्पष्ट केले आहे. आतापर्यंत ड्रोन चित्रीकरणासाठी सात, हेलिकॉप्टरसाठी तीन परवानग्या देण्यात आल्या आहेत.

निवडणुकीच्या प्रचारासाठी येत्या १९ ऑक्टोबपर्यंत म्हणजेच आजपासून केवळ आठ दिवस उरले आहेत. त्यामुळे सर्वपक्षीय उमेदवारांनी आपापल्या पक्षांच्या स्टार प्रचारकांना प्रचारासाठी आमंत्रित केले आहे. पुणे शहर, पिंपरी-चिंचवड आणि ग्रामीण भागात अनेक लढती चुरशीच्या आहेत. परिणामी सर्वपक्षीय नेते पुण्यात प्रचारासाठी येणार आहेत.

या पाश्र्वभूमीवर प्रचारात ड्रोन चित्रीकरण आणि हेलिकॉप्टरसाठी जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांची पूर्वपरवानगी घेणे बंधनकारक असल्याचे जिल्हा प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

आतापर्यंत हेलिकॉप्टरसाठी तीन, तर ड्रोनद्वारे चित्रीकरणासाठी सात परवानग्या देण्यात आल्या आहेत. ड्रोन चित्रीकरणासाठी उमेदवार अर्ज भरताना परवानग्या देण्यात आल्या आहेत. तसेच हेलिकॉप्टरसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष, ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या प्रचार दौऱ्यासाठी परवानगी देण्यात आली आहे, अशी माहिती जिल्हा प्रशासनाच्या गृह शाखेचे तहसीलदार श्रीनिवास ढोणे यांनी दिली.हेलिकॉप्टर उतरवण्यासाठी नियमानुसार हेलिपॅडची व्यवस्था करण्याचे आदेशही देण्यात आले आहेत.

राजकीय पक्षांना नागरी विमान महासंचालनालयाच्या नियमानुसार परवानगी देण्यात येत असून जिल्हाधिकाऱ्यांकडे नोंदणी करणे आवश्यक आहे, असेही ढोणे यांनी स्पष्ट केले.