संपूर्ण जगात भारताचा डंका वाजतो आहे याचं कारण आहे ते म्हणजे अनुच्छेद ३७० रद्द  करण्याचा निर्णय. जम्मू काश्मीर आणि लडाखच्या भविष्यासाठी आम्ही निर्णय घेतला. गेल्या सत्तर वर्षांपासून अनुच्छेद ३७० हे या जम्मू काश्मीरच्या विकासातला अडथळा होतं. हा अडथळा दूर करण्याच्या बाता अनेकांनी मारल्या पण कोणीही हिंमत दाखवली नाही असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्पष्ट केलं. पुण्यात झालेल्या प्रचारसभेत बोलत होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी बोलत असताना अनेकांनी मोदी मोदीच्या घोषणा दिल्या.

आत्ताचा भारत हा बदलेला भारत आहे. १३० कोटी भारतीय नागरिकांमुळे नव्या भारताचा विश्वास जगाला दिसतो आहे असंही मोदी यांनी म्हटलं आहे. २१ व्या शतकातला भारत हा निर्भय आहे, तो भयभीत होणारा भारत नाही असंही मोदी यांनी म्हटलं आहे. सुरक्षा, स्वच्छता आणि वेग या तिन्ही मुद्द्यांवर सरकार काम करतं आहे. वंदे भारत आणि तेजस एक्स्प्रेस आम्ही सुरु केल्या. पुण्यात मेट्रो सुरु करतो आहोत, पायाभूत सुविधांवर मोठ्या प्रमाणावर खर्च करतो आहोत.

गुंतवणुकीत सुधारणेसाठी आम्ही विशेष करणार आहोत असंही मोदींनी म्हटलं आहे. ५ वर्षात आम्ही पायाभूत सुविधांवर १०० लाख कोटी रुपये खर्च करणार आहोत त्याचा फायदा पुण्यालाही होणार आहे. पुणे ते पंढरपूर महामार्ग उभारला जाणार आहे अशीही घोषणा मोदी यांनी पुण्याच्या भाषणात केली. काही लोकांना आमच्या विरोधात बोलल्याशिवाय चैन पडत नाही असा टोला त्यांनी विरोधकांना लगावला.