अनेक नाट्यमघ घाडमोडींनंतर अखेर मंगळवारी राज्यातील सत्तास्थापनेचा तिढा सुटला. राज्यामध्ये महाविकास आघाडीचे सरकार स्थापन होणार आणि उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होणार यावर शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसने शिक्कामोर्तब केले. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर फडणवीस सरकारने मंगळवारी राजीनामा दिला आणि राज्यातील सत्तापेच सुटला. मात्र या राजीनाम्यानंतर काँग्रेसने नितेश राणेंची खिल्ली उडवली आहे.

काँग्रेसच्या प्रसारमाध्यम समन्वयक आणि माजी राष्ट्रीय सचिव असलेल्या राधिका खेरा यांनी नितेश राणेंवर खोचक टीका केली आहे. १२ नोव्हेंबर रोजी राज्यामध्ये राष्ट्रपती राजवट लागू झाल्यानंतर नितेश राणेंनी एक ट्विट केले होते. यावरुनच राधिका यांनी नितेश यांना टोला लगावला आहे. राज्यामध्ये तीन आठवड्यानंतरही सत्ता स्थापनेचा तिढा न सुटल्यानं राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करण्याची शिफारस केल्यानंतर राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी राज्यात राष्ट्रपती राजवट लागू केली. त्यानंतर नितेश यांनी नारायण राणेंचा फोटो ट्विट केला होता. या फोटोला त्यांनी “अब आयेगा मजा” अशी कॅप्शन दिली होती. मंगळवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राजीनामा दिल्यानंतर राधिका यांनी हेच ट्विट कोट करुन रिट्विट केले. या ट्विटला कॅप्शन देताना त्यांनी सलमान खानच्या ‘वॉण्टेड’ चित्रपटातील एका गाण्याचे शब्द वापरले आहेत. राधिका यांनी निलेश यांना “ले ले ले ले ले मज़ा ले… आज का जमके मज़ा ले” असा खोचक सल्ला दिला.

मुख्यमंत्र्यांनी राजीनाम्याची घोषणा केल्यानंतर अवघ्या काही मिनिटांमध्ये राधिका यांनी केलेल्या या ट्विटला चार हजारहून अधिक लाईक्स मिळाले आहेत.