छगन भुजबळ यांनी बाळासाहेब ठाकरेंना अटक करण्याच्या आदेशावर सही केली होती. आता त्यांनी माफी मागावी अशी मागणी शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी केली. ज्याबाबत राज ठाकरेंना प्रश्न विचारण्यात आला असता, बाळासाहेब ठाकरे हयात होते तेव्हा मातोश्रीवर छगन भुजबळांना उद्धव ठाकरेंनीच जेवायला बोलावलं होतं. आता माफीची अपेक्षा करुन निवडणुकीच्या तोंडावर कसले मुद्दे तापवता आहात? असा प्रश्न विचारत राज ठाकरेंनी उद्धव ठाकरेंना टोला लगावला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

“शिवसेनाप्रमुख बा‌ळासाहेब ठाकरे यांना अटक करणे, ही राष्ट्रवादी काँग्रेसची चूकच होती. फक्त काही वरिष्ठांच्या हट्टापायी ही कारवाई करण्यात आली,” असं माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी एका मराठी वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत म्हटलं होतं. “बाळासाहेबांच्या अटकेविषयी आम्ही त्यावेळी संबंधित व्यक्तीला विचारलं की असे का करता, तेव्हा ते म्हणाले, की आम्ही या विभागाचे प्रमुख आहोत. आम्हाला योग्य वाटतो तो निर्णय आम्ही घेणार आहोत.” असं अजित पवार यांनी नेत्याच्या नावाचा उल्लेख टाळत सांगितलं होतं. मात्र, बाळासाहेबांना अटक झाली तेव्हा छगन भुजबळ हे गृहमंत्री होते.

याबाबत उद्धव ठाकरेंनी आता छगन भुजबळांनी हातून चूक झाल्याबद्दल माफी मागावी अशी मागणी शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरेंनी त्यांच्या भाषणातून केली. शिवसेना खासदार यांनीही याबाबत माफी मागितली जावी अशी मागणी केली. ज्यावर राज ठाकरेंना विचारलं असता, “बाळासाहेब ठाकरे हयात असताना तुम्ही छगन भुजबळ यांना मातोश्रीवर जेवायला बोलावलं होतं. आता त्यांच्याकडून माफीची अपेक्षा कशी काय करता?” असं त्यांनी म्हटलं आहे. निवडणुकीशी संबंधित जे मुद्दे आहेत ते मांडा उगाच भलत्या विषयांवर कशाला बोलत आहात असंही राज ठाकरेंनी म्हटलं आहे. एबीपी माझा आणि लोकसत्ताच्या ‘माझा महाराष्ट्र माझं व्हिजन’ या कार्यक्रमात राज ठाकरे यांनी हे वक्तव्य केलं आहे.

 

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Raj thackeray reaction on chagan bhujabal apology demand by uddhav thackeray scj
First published on: 14-10-2019 at 19:28 IST