भाजपला सर्वाधिक फटका; शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादीचीही डोकेदुखी

मुंबई : बंडखोरांनी माघार घ्यावी, अन्यथा त्यांची खैर नाही, असा इशारा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देऊनही त्याचा फारसा परिणाम भाजप आणि शिवसेनेच्या बंडखोरांवर झालेला नाही. युतीतच मोठय़ा प्रमाणावर बंडखोरी झाली असून, काही ठिकाणी दोन्ही पक्षांचे उमेदवार परस्परांच्या विरोधात रिंगणात आहेत.

सिंधुदुर्ग जिल्ह्य़ात भाजप आणि शिवसेना एकत्र येऊ शकले नाहीत. तिथे हे दोन्ही पक्ष एकमेकांविरोधात उभे ठाकले आहेत. काँग्रेस आणि राष्ट्रवादीतही काही मतदारसंघांमध्ये बेबनाव निर्माण झाला. भाजपच्या विरोधात ठाणे आणि पुण्यात राष्ट्रवादी आणि मनसेत समझोता झाला. बंडखोरांना किती मते मिळतात, यावर अधिकृत उमेदवारांचे भवितव्य ठरणार आहे.

उमेदवारी अर्ज मागे घेण्याची सोमवापर्यंत मुदत होती. या मुदतीत भाजप आणि शिवसेनेतील काही बंडखोरांनी माघार घेण्यास नकार दिला. परिणामी मराठवाडय़ाचा अपवाद वगळता विदर्भ, उत्तर महाराष्ट्र, पश्चिम महाराष्ट्र, कोकणात सिंधुदुर्ग, ठाणे आणि रायगडमध्ये बंडखोरी मोठय़ा प्रमाणावर झाली. पुन्हा सत्तेत परतणार, असा दावा भाजपची मंडळी करीत असतानाच भाजपमध्येच सर्वाधिक बंडखोरी झाली आहे. बंडखोरी सहन करणार नाही आणि बंड झाल्यास जागा दाखवून देऊ, असा इशारा मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिला होता. पण उमेदवारी नाकारलेल्या

भाजपच्याच काही आमदारांनी बंडखोरी केली आहे. भाजप आणि शिवसेनेत काही मतदारसंघांमध्ये मेळ जमू शकला नाही.

सिंधुदुर्ग जिल्ह्य़ात नारायण राणे यांना विरोध करणाऱ्या शिवसेनेने भाजपशी युती करण्याचे टाळले. नितेश राणे यांच्याविरोधात शिवसेनेने उमेदवार उभा केल्याने अन्य दोन मतदारसंघांमध्ये राणे यांनी उमेदवार उभे केले. राणे आणि शिवसेनेत समझोता घडवून आणण्यात मुख्यमंत्री फडणवीस आणि प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांना अपयश आले. परिणामी राज्यात युती असली तरी सिंधुदुर्गमध्ये दोन्ही पक्ष परस्परांविरोधात रिंगणात आहेत. तिन्ही मतदारसंघांमध्ये या दोन पक्षांमध्येच चुरशीच्या लढती होण्याची चिन्हे आहेत. भाजप आणि शिवसेनेप्रमाणेच काँग्रेस-राष्ट्रवादीत काही मतदारसंघांमध्ये बंडखोरी झाली आहे.  काही मतदारसंघांमध्ये काँग्रेस व राष्ट्रवादीचे उमेदवार परस्परांच्या विरोधात उभे ठाकले आहेत.  भाजपचा पराभव करण्यासाठीच राष्ट्रवादी आणि मनसेत समझोता झाला. ठाण्यात राष्ट्रवादीच्या उमेदवाराने मनसेसाठी माघार घेतली. पुण्यात कोथरुड मतदारसंघात चंद्रकांत पाटील यांच्या विरोधात मनसेच्या उमेदवाराला राष्ट्रवादी आणि काँग्रेसने पाठिंबा जाहीर केला.    वर्सोवा मतदारसंघात भाजपच्या भारती लव्हेकर यांच्या विरोधात शिवसेनेच्या  राजूल पटेल यांनी बंडखोरी कायम ठेवली. अंधेरी पूर्व मतदारसंघात शिवसेनेचे रमेश लटके यांच्या विरोधात भाजपच्या मुरजी पटेल यांनी माघार घेतली नाही. मीरा-भाईंदर मतदारसंघात भाजपचे आमदार नरेंद्र मेहता यांच्या विरोधात पक्षाच्याच माजी महापौर गीता जैन यांनी बंडखोरी केली आहे. उरण मतदारसंघात भाजपच्या महेश बालदी यांची उमेदवारी कायम असल्याने  सेनेच्या आमदाराची कोंडी झाली आहे.

‘मातोश्री’च्या अंगणातच बंडखोरी

मुंबईचे महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांच्या विरोधात वांद्रे पूर्व मतदारसंघात शिवसेनेच्या विद्यमान आमदार तृप्ती सावंत यांनी बंडखोरी केली आहे. सावंत यांनी माघार घ्यावी, यासाठी ‘मातोश्री’वरून बरेच प्रयत्न झाले, पण सावंत यांनी दाद दिली नाही. परिणामी ‘मातोश्री’च्या अंगणातच बंडखोरी झाली आहे.

कल्याणमध्ये युतीत बंड

कल्याण पश्चिम मतदारसंघात भाजपचे विद्यमान आमदार नरेंद्र पवार यांनी बंडखोरी केली आहे. हा मतदारसंघ युतीत शिवसेनेच्या वाटय़ाला गेल्याने पवार यांनी अपक्ष म्हणून अर्ज दाखल केला. पवार यांच्या उमेदवाराचे शिवसेनेच्या उमेदवारासमोर आव्हान असेल. कल्याण पूर्व मतदारसंघात भाजपचे विद्यमान आमदार गणपत गायकवाड यांच्याविरोधात शिवसेनेच्या नगरसेवकाने बंड केले आहे. अंबरनाथमध्ये काँग्रेस उमेदवाराच्या विरोधात राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांने बंड केले.