विधानसभा निवडणुकीचे निकाल हे एकतर्फी न लागता धक्कादायक म्हणावेत असेच लागले आहेत. अनेक दिग्गजांचा यामध्ये पराभव झाला. त्यात एक महत्त्वाचं नाव होतं ते म्हणजे रोहिणी खडसे. रोहिणी खडसे या एकनाथ खडसेंच्या कन्या आहेत. त्या जळगावातील मुक्ताईनगर मतदारसंघातून त्यांनी निवडणूक लढवली. मात्र बंडखोरी केलेल्या चंद्रकांत पाटील यांनी रोहिणी खडसेंना हरवलं. या पराभवामागे भाजपाची चाणक्यनीती आहे असा आरोप राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांनी केला आहे.

दरम्यान विधानसभा निवडणूक निकालात महायुतीला स्पष्ट बहुमत मिळालं आहे. मात्र अबकी बार २०० के पार हा दावा मात्र फोल ठरला आहे. भाजपाला १०५ जागा मिळाल्या आहेत तर शिवसेनेला ५६ जागा. २०१४ च्या तुलनेत शिवसेनेच्या जागा कमी झाल्या आहेत. मात्र बार्गेनिंग पॉवर वाढली आहे ती शिवसेनेची कारण शिवसेनेच्या टेकूशिवाय भाजपाचा मुख्यमंत्री होऊ शकत नाही.त्यामुळे शिवसेनेची भूमिका या सगळ्याबाबत महत्त्वाची ठरणार आहे.

दरम्यान शिवसेनेचा मुख्यमंत्री करायचा असेल तर राष्ट्रवादीला सोबत घ्या अशी ऑफर भुजबळ यांनी उद्धव ठाकरेंना दिली आहेच. आता पुढे काय काय घडामोडी घडणार ते येत्या काही दिवसात स्पष्ट होईलच. तूर्तास तरी छगन भुजबळ यांनी रोहिणी खडसेंचा पराभव करण्यामागे भाजपाची चाणक्यनीती आहे असा आरोप केला आहे. आता या आरोपाला भाजपा काही उत्तर देणार का हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.