शिवसेनेच्या पाठीत वार करणारे आजच्या घडीला घायाळ झाले आहेत. असा टोला शिवसेना खासदार संजय राऊत यांनी लगावला. शिवसेनेचा दसरा मेळावा शिवाजी पार्क मैदानात सुरु आहे. याचवेळी बोलताना संजय राऊत यांनी शिवसेना सोडून गेलेल्या सगळ्यांवर टीका केली. एवढंच नाही तर अनुच्छेद 370 रद्द करणं ही भूमिका सर्वात पहिल्यांदा बाळासाहेब ठाकरे यांनी घेतली होती. आत्ताचं सरकार हे बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांवर चालते आहे असं संजय राऊत यांनी म्हटलं आहे.

काश्मीर प्रकरणात आम्ही कायम तुमच्यासोबत आहोत असंही संजय राऊत यांनी म्हटलं आहे. संजय राऊत यांनी यावेळी विरोधकांवरही निशाणा साधला. गेल्या पाच वर्षात विरोधकांची अवस्था एवढी वाईट झाली की महाराष्ट्रात विरोधकच उरले नाहीत. विरोधक आधी सत्ताधाऱ्यांना जाब विचारण्याचं काम करायचे आता मात्र गेल्या पाच वर्षात ती भूमिकाही शिवसेनेचे बजावली. जे मुद्दे आम्हाला पटले नाहीत तिथे आम्ही जनतेच्या बाजूने उभे राहिलो असंही संजय राऊत म्हणाले.

एक पाऊल मागे गेलो म्हणून काळजी करु नका एक पाऊल मागे जातो तेव्हा मारायची असते ती अधिक उंच उडी असं म्हणत त्यांनी भाजपालाही टोला लगावला. तसंच शिवसेनेला ज्यांनी ज्यांनी दगा दिला, ज्यांनी पाठीत वार केले ते आजच्या घडीला घायाळ झाले आहेत. अस्तित्त्वासाठी चाचपडत आहेत असंही संजय राऊत यांनी म्हटलं आहे. यावेळी ‘आवाज कुणाचा शिवसेनेचा’ हे गाणंही सादर करण्यात आलं. स्वप्नील बांदोडकर यांनी हे गाणे गायले आहे तर अवधूत गुप्ते यांनी या गाण्याला संगीत दिलं आहे.