भाजपाचे अध्यक्ष अमित शाह हे पंतप्रधान नरेंद्र मोदींना शिवसेनेपासून लांब ठेवण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी केला आहे. मोदींचे बाळासाहेबांबरोबर खास नातं होतं. हे नातं ते पंतप्रधान होण्याआधीपासूनचं होतं. आता कोणीतरी मोदी आणि उद्धव ठाकरेंमध्ये फूट पाडू पाहत आहे असा आरोपही राऊत यांनी केला आहे. मुंबईमध्ये पत्रकार परिषदमध्ये त्यांनी अमित शाह यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंबरोबर झालेले बोलणे मोदींपर्यंत पोहचवायला हवं होतं असंही मत राऊत यांनी व्यक्त केलं आहे. ‘बाळासाहेबांच्या खोलीमध्ये बंद दाराआड उद्धव ठाकरे आणि अमित शाह यांच्यामध्ये काय चर्चा झाली हे मोदींपर्यंत योग्य पद्धतीने पोहचवले गेले नाही. त्यामुळे हा गोंधळ झाला आहे,’ असंही राऊत म्हणाले. शिवसेनेला मुख्यमंत्री पद दिले जाईल असे कोणतेही आश्वासन भाजपने विधानसभा निवडणुकीपूर्वी झालेल्या युतीच्या चर्चेत केलेले नव्हते, असे स्पष्टीकरण शाह यांनी दिले होते.

राऊत यांनी मुंबईमध्ये घेतलेल्या पत्रकार परिषदेमध्ये लोकसभा निवडणुकीआधी अमित शाह आणि उद्धव ठाकरे यांच्यादरम्यान मातोश्रीवर झालेल्या चर्चेबद्दल भाष्य केलं. “शिवसेनेनेही वारंवार मुख्यंत्रीपदाबद्दल भाष्य केलं होतं. त्यावेळी अमित शाह यांनी आक्षेप व्यक्त केला नाही,” असं राऊत म्हणाले. “बंद दाराआड झालेली चर्चा काय होती हे अमित शाह यांनी स्पष्ट करायला हवं. मातोश्रीवरील ज्या खोलीमध्ये शाह आणि उद्धव यांच्यामध्ये चर्चा झाली ती साधीसुधी खोली नसून ती बाळासाहेबांची खोली होती. याच खोलीमध्ये बसून बाळासाहेबांनी अनेकदा मोदींनी आशिर्वाद दिले आहेत. ही खोली आमच्यासाठी मंदिर आहे. येथे झालेली चर्चा कोणी नाकारत असेल तर तो बाळासाहेबांचा आणि महाराष्ट्राचा अपमान आहे,” असं राऊत म्हणाले.

काय म्हणाले होते शाह

“शिवसेनेला मुख्यमंत्री पद दिले जाईल असे कोणतेही आश्वासन भाजपने विधानसभा निवडणुकीपूर्वी झालेल्या युतीच्या चर्चेत केलेले नव्हते. महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मी अनेकदा जाहीरपणे सांगितले होते की, युतीचा विजय झाला तर देवेंद्र फडणवीस हेच मुख्यमंत्री होतील. त्यावर कोणीही (शिवसेनेने) एकदाही आक्षेप घेतला नाही. आता मात्र कोणी नवीन अटी घालत असेल तर ते भाजप कसे मान्य करेल?”, असा सवाल उपस्थित करत शहा यांनी उद्धव ठाकरे यांचे आरोप फेटाळले होते.