“राज्यामधील मुख्यमंत्री आणि सत्ता स्थापनेसाठी केंद्रातील सत्ताधाऱ्यांना बहुमत असल्याचे सांगत असताना चंबळमधील डाकूंसारखी गुंडगिरी करण्याची काय गरज होती?,” असा सवाल शिवसेनेचे नेते आणि खासदार संजय राऊत यांनी उपस्थित केला आहे. मुंबईमध्ये घेतलेल्या पत्रकार परिषदेमध्ये राऊत यांनी पत्रकारांशी संवाद साधताना भाजपाकडून राष्ट्रवादीचे आमदार फोडण्याचा प्रयत्न झाल्याचा आरोप केला.

राज्यातील सत्तासंघर्षाला शनिवारी अगदीच अनेपेक्षित कलाटणी मिळाली. शुक्रवार रात्रीपर्यंत शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे सरकार सत्तेत येईल असं वाटत असतानाच अचानक शनिवारी भाजपाचे नेते देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रीपदाची तर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. त्यानंतर बहुमतासाठी राज्यामधील आमदारांची फोडाफोडी होण्याच्या शक्यतेमुळे सर्वच राजकीय पक्षांनी खबरदारीचा उपाय म्हणून काळजी घेत असतानाच राऊतांनी भाजपाकडून राष्ट्रवादीचे आमदार फोडण्याचा प्रयत्न सुरु असल्याचा आरोप केला आहे. “गुरुग्राममधील हॉटेल ऑबोरॉयमध्ये रुम क्रमांक ५११७ मध्ये राष्ट्रवादीचे आमदार फोडण्याचा प्रयत्न झाला. तेथे शिवसेना आणि राष्ट्रवादीचे नेते पोहचले. तेथून त्यांना सोडवण्यात आले आहे. त्यानंतर त्या आमदारांनी त्यांना भाजपाने काय ऑफर दिली आणि कशाप्रकारे दमदाटी केली याबद्दल सांगितले. या सर्व गोष्टी देशाच्या लोकशाहीला शोभणाऱ्या नाहीत. दौलत दरोडा, नरहर झिरवाळ, अनिलभाई पाटील या आमदारांना गुरुग्रामच्या हॉटेलमध्ये कोंडून ठेवण्यात आले होते. त्यांच्यावर लक्ष ठेवण्यासाठी तेथे काही गुंड आणि हरियाणामध्ये सत्ता असल्याने तेथील पोलिस ठेवण्यात आले. महाराष्ट्राचे मुख्यमंत्रीपद तसेच सत्ता मिळवण्यासाठी या देशातील राज्यकर्ते कोणत्या थराला जात आहेत हे घ्रृणास्पद आहे. तुमच्याकडे बहुमत होतं. तुम्ही ते राज्यपालांना दाखवलं आणि शपथ घेतली. जर बहुमत होतं तर चंबळच्या डाकूंसारखी ही गुंडगिरी, दरोडेखोरी करण्याची गरज काय होती?” असा सवाल राऊत यांनी उपस्थित केला आहे. राज्यपाल, राष्ट्रपती आणि महाराष्ट्राच्या जनतेची फसवणूक केल्याचाही आरोप राऊत यांनी केला आहे.

आणखी वाचा- सत्ता नसेल तर भाजपाचे नेते वेडे होतील : संजय राऊत

तसेच यशवंतराव चव्हाण यांचे उदाहरण देत राऊतांनी भाजपावर निशाणा साधला आहे. “बहुमत नसताना शपथ घेतली आणि बहुमतासाठी सत्तेचा, पैश्याचा आणि तपास यंत्रणांचा गैरवापर केला. आम्ही या सर्वांना पुरुन उरु. तुम्ही कितीही गडबड करा किंवा घोटाळा करा विधिमंडळामध्ये विश्वासदर्शक ठरवाच्या वेळेला आमचा आकडा तुमच्यापेक्षा दहाने जास्त असेल”, असा विश्वासही राऊत यांनी व्यक्त केला आहे.