07 July 2020

News Flash

“बघू आपल्यासोबत कोण कुस्ती खेळतो”, पद्मसिंह पाटील यांना शरद पवारांचा टोला

पद्मसिंह पाटील यांचं नाव न घेता शरद पवार यांची टीका

(संग्रहित छायाचित्र)

“आपण सगळे नव्या इतिहासाचे साक्षीदार होऊया, बघू आपल्यासोबत कोण कुस्ती खेळतो ” अशा शब्दात पद्मसिंह पाटील यांचं नाव न घेता शरद पवार यांनी त्यांच्यावर निशाणा साधला. उस्मानाबाद येथील सभेत ते बोलत होते. उस्मानाबाद  जिल्ह्यात नव्या नेतृत्त्वाला संधी देण्यासाठीची अनुकूल स्थिती आहे. यामुळे आपल्याला विरोधकांना धडाही शिकवता येईल असंही शरद पवार यांनी म्हटलं आहे.

उस्मानाबाद शहरातील पुष्पक मंगल कार्यालयात राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्ता मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी पवारांनी जोरदार फटकेबाजी करीत डॉ. पद्मसिंह पाटील आणि राणाजगजितसिंह पाटील यांच्यासह मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर शेलक्या शब्दांमध्ये टीका केली.  यावेळी विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे, आमदार सतीश चव्हाण, आमदार राहुल मोटे, आमदार विक्रम काळे, जिल्हाध्यक्ष सुरेश बिराजदार, जीवन गोरे यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

“व्यवस्था उलथून जात असताना आपण बघ्याची भूमिका घेणार नाही. माझ्याइतके प्रेम अन्य कोणी केल्याचे उदाहरण दाखवा. सोलापूर येथील सभेत भाजपा अध्यक्षांच्या पायाचे दर्शन काहीजणांनी घेतले. स्वाभिमानाची नवी व्याख्या आता पहावी लागते आहे”, असे म्हणत शरद पवार यांनी  पाटील यांचा खरपूस समाचार घेतला. “उस्मानाबाद जिल्ह्यातील दुष्काळ आणि पाणीप्रश्न लक्षात घेऊन राज्याच्या पाण्याचे धोरण ठरविण्याचा अधिकार आपण यांना दिला. तो योग्य पध्दतीने राबवता आला नाही, याला आपण कसे जबाबदार?”  असे सांगत डॉ. पद्मसिंह पाटील यांच्या कार्यपध्दतीवर शरद पवार यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले.

“राज्यात यंदा 16 हजार शेतकर्‍यांच्या आत्महत्या झाल्या आहेत. त्याचे उत्तर देण्याऐवजी फडणवीस नको त्या गोष्टीचा प्रचार करीत आहेत. यांच्यात हिशोब देण्याची ताकद नाही. एका बाजूला बेकारी आणि दुसरीकडे मंदी अशा वाईट परिस्थितीतून देश जात आहे. राज्यकर्त्यांना मात्र या प्रश्नांची तसदी घ्यावी वाटत नाही. यांना हिशोब विचारला असता, ते उलट आपल्यालाच प्रश्न विचारतात आणि लोकांचे लक्ष मुख्य प्रश्नांपासून विचलित करतात. आपणाला जिल्ह्याचा विकास करावयाचा आहे, असे सांगत ज्याने पक्षांतर केले, त्याच्या हातात इतकी वर्षे सगळी सत्ता दिली होती. मग विकास का केला नाही?” असा सवालही शरद पवार यांनी उपस्थित केला.

राणा पाटील बालिश बुध्दीचे!
लहान मुलांचे बोलणे आपण मनावर घेत नाही. राणा पाटील बालिश बुध्दीचे आहेत. पक्षातून कुरघोडी केली जात होती, तर हे जबाबदार नेतृत्वाच्या ध्यानात आणून देण्याचा अधिकार डॉ. पद्मसिंह पाटील यांच्याकडे होता. त्यांनी असे केले असते तर त्यांचा सन्मानच करण्यात आला असता. आपण कधीच कोणाच्या दारात गेलो नाही. स्वतः पक्ष स्थापन केला. आघाडीमध्ये मनसेला घेण्यात आमची हरकत नव्हती. काँग्रेसमुळे ते होऊ शकले नाही असंही पवार यांनी म्हटलं आहे.

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 17, 2019 8:54 pm

Web Title: sharad pawar criticized padmsinha patil in osamanabad speech scj 81
Next Stories
1 “शरद पवारांनी जो सन्मान दिला तेवढा भाजपाच्या सात पिढ्याही देणार नाहीत”
2 मी लवकरच भाजपात प्रवेश करणार-नारायण राणे
3 भाजपाच्या राज्यात रोजगार मिळालेल्या तरुणाशी कोहलीचे हस्तांदोलन; काँग्रेस नेत्याने दाखवला फोटो
Just Now!
X