कुस्ती बरोबरीच्या पैलवानांसोबत खेळतात लहान मुलांशी नाही असा टोला राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना लगावला. शेतकऱ्यांच्या वाढत्या आत्महत्यांवरुनही त्यांनी राज्य सरकारवर टीका केली. आपल्याला ठाऊकच आहे की देवेंद्र फडणवीस यांनी काही दिवसांपूर्वीच एक वक्तव्य केलं होतं. मुख्यमंत्री म्हणाले होते, “विधानसभा निवडणूक समोर आली आहे. अशात आमचे पैलवान आखाड्यात उतरले आहेत. मात्र समोर कोणीही दिसत नाही. शरद पवार यांची अवस्था तर शोले सिनेमातल्या जेलरसारखी झाली आहे. आधे इधर जाओ, आधे उधर जाओ बाकी बचे मेरे पिछे आओ असं शरद पवार म्हणतात आणि मागे वळून पाहतात तेव्हा कुणीही नसतं”

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ही टीका केल्यानंतर शरद पवार यांनी वारंवार यावरुन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधला. बार्शी येथील सभेत विशिष्ट हातवारे करत शरद पवार यांनी कुस्ती अशांशी लढली जात नाही असं म्हटलं होतं. त्यावरही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उत्तर देत आम्ही नटरंग नाही असं म्हटलं होतं. कुस्ती, पैलवान या शब्दांवरुन इतक्या फैरी झाडल्या गेल्यानंतर शरद पवार यांनी पुन्हा एकदा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधला आहे. कुस्ती लहान मुलांशी केली जात नाही बरोबरीच्या पैलवानाशी केली जाते असं म्हणत शरद पवार यांनी मुख्यमंत्र्यांना टोला लगावला आहे.

आता शरद पवार यांच्या या वक्तव्याबाबत मुख्यमंत्री काही प्रतिक्रिया देतात का? आणि कुस्ती, पैलवान या दोन शब्दांवरुन सुरु झालेला हा वाद आणखी पुढे जातो का हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. शरद पवार यांनी मुख्यमंत्र्यांचं नाव न घेता त्यांचा उल्लेख लहान मूल असा केला आहे. निफाड येथील सभेत बोलताना शरद पवार यांनी हे वक्तव्य केलं आहे. विद्यमान सरकारला राज्य चालवायची पद्धत ठाऊक नाही असंही शरद पवारांनी म्हटलं आहे. सत्ता आल्यावर पाय जमिनीवर आणि डोकं जागेवर ठेवायचं असतं असा सल्लाही शरद पवार यांनी भाजपा सरकारला दिला.