राष्ट्रवादी काँग्रेस या पक्षाचं अस्तित्त्व स्वतंत्र आहे त्याबाबत आम्ही काय ते जाणतो. सुशील कुमार शिंदे यांनी काँग्रेस पक्षाबाबत बोलावं असं वक्तव्य आता राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी केलं आहे. राष्ट्रवादी काँग्रेसची आणि पक्षाच्या निर्णयाची मला माहिती जास्त आहे असा टोला लगावत शरद पवार यांनी सुशीलकुमार शिंदे यांनी सुरु केलेल्या विलीनीकरणाच्या चर्चेला पूर्णविराम दिला आहे. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी केंद्रीय सुशीलकुमार शिंदे यांनी परवाच काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस हे दोन्ही पक्ष थकले आहेत असं म्हणत या दोन्ही पक्षांनी एक होण्याची गरज आहे हे बोलून दाखवलं होतं.

सुशीलकुमार शिंदे यांच्या वक्तव्याबाबत प्रतिक्रिया देताना शरद पवार म्हणाले की, ” सुशीलकुमार शिंदे यांनी त्यांच्या पक्षाबद्दल बोलावं. राष्ट्रवादी काँग्रेस आणि त्यातील निर्णय याबाबत मला सुशीलकुमार शिंदे यांच्याबाबत जास्त माहिती आहे. त्यामुळे त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसबद्दल भाष्य करु नये तर काँग्रेसबाबत बोलावं”

सुशीलकुमार शिंदे यांनी काय म्हटलं होतं?

“काँग्रेस आणि राष्ट्रवादी भविष्यात एक होण्याची शक्यता आहे. खरंतर शरद पवार आणि माझ्यात फक्त साडेआठ महिन्यांचा फरक आहे. कधीकाळी आम्ही एकाच आईच्या मांडीवर वाढलो आहोत. जे झालं त्याबाबत आमच्याही मनात खंत आहे आणि त्यांच्याही मनात खंत आहे. पण ते कधी बोलून दाखवत नाहीत. पण वेळ येईल तेव्हा ते नक्की बोलून दाखवतील”

आणखी वाचा- सुशीलकुमार शिंदे स्वतः थकले आहेत, काँग्रेस-राष्ट्रवादी नाही : अजित पवार

सुशीलकुमार शिंदे यांच्या या वक्तव्यानंतर काँग्रेस आणि राष्ट्रवादी हे दोन्ही पक्ष विलीन होतील अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगली होती. मात्र या सगळ्या चर्चांना शरद पवार यांनी पूर्णविराम दिला आहे. याआधी अजित पवार यांनीही याबाबत प्रतिक्रिया देताना सुशीलकुमार शिंदे थकले असतील राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष थकलेला नाही अशी प्रतिक्रिया दिली होती. आता शरद पवार यांनीही यावर प्रतिक्रिया देत विलिनीकरणाच्या सगळ्या चर्चांना पूर्णविराम दिला आहे.

आणखी वाचा- ‘राष्ट्रवादी’ अजून थकलेला नाही