राज्यात मंगळवारी सायंकाळी राष्ट्रपती राजवट लागली. कोणत्याही पक्षाकडून सत्ता स्थापनेचा दावा केला जात नसल्यानं राज्यपालांनी हा निर्णय घेतला. राष्ट्रपती राजवट लागू झाल्यानंतर राज्यपालांनी घाई केली असा विरोधाचा सूर राजकीय वर्तुळातून लावला जात आहे. दरम्यान, या सगळ्याला शिवसेनेनं भाजपालाच जबाबदार धरले आहे. “कोणत्याही परिस्थितीत महाराष्ट्रात सत्ता स्थापन होऊ द्यायची नाही व राजभवनाच्या झाडाखाली बसून पत्ते पिसत बसायचे हा सर्व खेळ महाराष्ट्राची जनता पाहत आहे,” अशी टीका भाजपाचा नामोल्लेख टाळत शिवसेनेनं केली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

शिवसेनेनं सामनाच्या अग्रलेखातून सध्याच्या राजकीय घडामोडी आणि राष्ट्रपती राजवटीवर भाष्य केलं आहे. “महाराष्ट्रात घोडेबाजारास सुरुवात झाली नसली तरी त्या दिशेने पावले पडू लागली आहेत. राष्ट्रपती राजवटीची शिफारस हा त्यातलाच एक प्रकार. आम्ही नाही तर कुणीच नाही हा जो एक अहंकाराचा दर्प निकालानंतर दरवळू लागला आहे तो काही राज्याच्या हिताचा नाही. भारतीय जनता पक्ष हा तत्त्वाचा, नीतिमत्तेचा, संस्काराने वागणारा पक्ष आहे असे म्हणतात, पण महाराष्ट्राच्या बाबतीत ही तत्त्वे आणि संस्कार त्यांनी पाळायलाच हवे होते. भारतीय जनता पक्ष विरोधी पक्षात बसायला तयार आहे. याचा अर्थ काँग्रेस, राष्ट्रवादीला पाठबळ द्यायला तयार आहे असा काढला तर त्यांना मिरच्या झोंबायचे कारण नाही. ठरल्याप्रमाणे भाजप शब्दाला जागला असता तर परिस्थिती इतक्या थरास गेली नसती. शिवसेनेस जे ठरले आहे ते देणार नाही, भले आम्ही विरोधी बाकडय़ांवर बसू हा डावपेचाचा भाग नसून शिवसेनेस पाण्यात पाहण्याचा दुर्योधनी कावा आहे. कोणत्याही परिस्थितीत महाराष्ट्रात सत्ता स्थापन होऊ द्यायची नाही व राजभवनाच्या झाडाखाली बसून पत्ते पिसत बसायचे हा सर्व खेळ महाराष्ट्राची जनता पाहत आहे,” असा इशारा शिवसेनेनं भाजपाला दिला आहे.

राज्यपालांच्या भूमिकेवरही शिवसेनेनं बोट ठेवलं आहे. “राज्यपाल हे सत्ताधारी पक्षाचेच असतात, पण किमानपक्षी त्यांनी स्वतंत्र वृत्तीने वागावे व घटनेतील उद्देशांचे पालन करण्याची आणि कायद्याची बांधिलकी पाळण्याची शपथ विसरू नये एवढी अपेक्षा असते. पण सध्याच्या राजकारणात सब घोडे बारा टके या न्यायाने साधनशूचितेच्या गप्पा मारणारेच सगळय़ात जास्त गोंधळ व भेसळ करीत आहेत. महाराष्ट्रासारख्या राज्यात जो खेळ मांडला आहे त्यामुळे कुणाचा कंडू शमणार असेल तर त्याने जरूर खाजवत बसावे. शिवसेनेची पावले कोणत्या दिशेने पडत आहेत यावर टीका आणि टिप्पण्या करूद्यात. कश्मीरात मेहबुबा व बिहारात नितीशकुमार यांच्याशी ‘घरोबा’ करताना तत्त्वे आणि विचारांचे काय झाले? बिहारात जनादेश नितीशकुमार व लालू यादवांना होता. तो जनादेश मोडून भाजप व नितीशकुमारांचा ‘पाट’ लागलाच ना! आम्हाला आता चिंता वाटते ती नितीशकुमारांची. महाराष्ट्रात स्थिर राज्य यावे, ते लवकरात लवकर यावे, महाराष्ट्राच्या हिताचे व जनतेच्या कल्याणाचे काही घडावे हीच आई जगदंबेचरणी प्रार्थना!,” असं शिवसेनेनं म्हटलं आहे.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Shiv sena criticized to bjp over president rule bmh
First published on: 13-11-2019 at 07:58 IST