राज्यातील सत्तास्थापनेचा तिढा अद्यापही सुटलेला नाही. सध्या राज्यात राष्ट्रपती राजवट लागू आहे. तर दुसरीकडे शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसकडून नवी आघाडी करून सत्ता स्थापन करण्याचे प्रयत्न सुरू आहे. यासाठी सध्या काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या बैठकांचं सत्रही सुरू आहे. त्यातच शिवसेना आणि भाजपामधील वाद विकोपाला गेला आहे. त्यानंतर आज शिवसेना खासदार संजय राऊत यांनी ‘हम बुरे ही ठीक हैं’ असं म्हणत भाजपावर निशाणा साधला आहे.

बुधवारी रात्री काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचं चर्चासत्र सुरू असतानाच संजय राऊत यांनी गोड बातमी लवकरच येणार असल्याचं म्हटलं होतं. तर आता पेढ्यांची ऑर्डर देण्यासही हरकत नसल्याचं ते म्हणाले होते. त्यानंतर आज त्यांनी ट्विटरच्या माध्यमातून भाजपावर निशाणा साधला. ‘हम बुरे ही ठीक है, जब अच्छे थे तब कौनसा मेडल मिल गया था… !!’ असं ट्विट करत त्यांनी भाजपाला टोला लगावला आहे.

सध्या राज्यात शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या नव्या आघाडीनं सत्ता स्थापनेसाठी हालचाली सुरू केल्या आहेत. त्यातच शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री व्हावं, अशी महाराष्ट्राची इच्छा असल्याचं राऊत यांनी म्हटलं होतं. तसंच शिवतीर्थावर मुख्यमंत्र्यांचा शपथविधी होईल आणि तेव्हा तुम्हाला त्यांचं नाव कळेलच, असंही राऊत म्हणाले होते.