राज्यातील विधानसभा निवडणुकीचे निकाल आता हाती आले आहेत. अशातच मुख्यमंत्रिपदावरून शिवसेना आणि भाजपामध्ये शाब्दीक चकमक सुरू असल्याचं पहायला मिळत आहे. त्यातच शिवसेनेचे नेते खासदार संजय राऊत यांनी मोठं विधान केलं आहे. “आम्हाला सरकार स्थापनेसाठी अन्य पर्याय निवडण्यास भाग पाडू नका असा इशाराच संजय राऊत यांनी दिला. राजकारणात कोणीही संत नसतो,” असंही ते म्हणाले. विधानसभा निवडणुकीत कोणत्याही एका पक्षाला बहुमत मिळालं नाही. शिवसेना आणि भाजपा एकत्रित या निवडणुका लढले होते. भाजपाला १०५ जागांवर तर शिवसेनेला ५६ जागांवर विजय मिळाला होता.

लोकसभा निवडणुकीपूर्वीच शिवसेना आणि भाजपाचा युतीचा फॉर्म्युला ठरला असल्याचं म्हटलं जात आहे. त्यातच शिवसेनेने अडीच वर्षे मुख्यमंत्रिपद आपल्याला मिळावं अशी मागणी केली आहे. तर निवडणुकीच्या निकालांनंतर काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसकडूनही शिवसेनेचा मुख्यमंत्री बसल्यास पाठिंबा देण्याचे संकेत देण्यात आले होते. “आम्ही भाजपासोबत असलेल्या युतीवर विश्वास ठेवतो. परंतु भाजपाने आम्हाला सरकार स्थापनेसाठी पर्याय शोधण्यास भाग पाडू नये. राजकारणात कोणीही संत नसतं,” असं राऊत म्हणाले. एका खासगी वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी हा इशारा दिला.

“सरकार स्थापन करण्यासाठी शिवसेना आणि भाजपामध्ये अद्याप कोणतीही चर्चा करण्यात आली नाही. जर भाजपानं स्वत: बहुमत मिळवलं तर आम्ही त्याचं स्वागत करू,” असं राऊत म्हणाले. “त्यांनी निवडणुकीपूर्वी आम्हाला शब्द दिला होता. तुम्ही कागद गायब करू शकता. परंतु माध्यमांसमोर दिलेली वक्तव्य कशी डिलिट कराल. तुम्ही कागद फाडू शकता. फाईल्स गायब करू शकता. मंत्रालयात आगही लावू शकता. परंतु त्यांना आपली वक्तव्य डिलिट करता येणार नाहीत,” असंही त्यांनी नमूद केलं. तसंच मुख्यमंत्रिपदी कोण विराजमान होईल, हे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेच ठरवणार असल्याचं त्यांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना स्पष्ट केलं.