उद्धव ठाकरे यांचे उपरोधिक उद्गार

मुंबई : युतीची चर्चा अजूनही सुरू असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हेच शिवसेनेच्या वाटय़ाच्या जागांची यादी ठरवतील आणि मी ती पक्षाच्या नेत्यांसमोर मांडेन, असे उपरोधिक उद्गार शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी काढल्याने जागावाटपातील भाजपच्या प्रस्तावावर शिवसेना नाखूश असल्याची चर्चा सुरू झाली आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष आणि गुहागरचे आमदार भास्कर जाधव यांनी शुक्रवारी दुपारी ‘मातोश्री’ येथे पुन्हा शिवसेनेत प्रवेश केला. यावेळी उद्धव ठाकरे बोलत होते. युतीबाबत पत्रकारांनी विचारले असता, त्यांनी प्रथमच आपली नाराजी अप्रत्यक्षपणे व्यक्त  केली.

उद्धव ठाकरे यांच्या या विधानाबाबत भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांना प्रतिक्रिया विचारली असता, यावर काहीही भाष्य करणार नाही, असे उत्तर त्यांनी दिले.

विधानसभेच्या २००४ च्या निवडणुकीच्या वेळी भास्कर जाधव हे शिवसेनेतून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये गेले होते. मध्यंतरी त्यांनी उद्धव ठाकरे यांची भेट घेतली होती. बुधवारी सकाळी भास्कर जाधव यांनी औरंगाबादला जाऊन आमदारकीचा राजीनामा दिला. त्यानंतर लगेच दुपारी ‘मातोश्री’ येथे पोहोचत उद्धव ठाकरे यांच्याकडून शिवबंधन बांधून घेतले.

‘‘मी कधीच कुणालाही दोष दिला नव्हता, कोणावरही आरोप वा टीका केली नव्हती, मिलिंद नार्वेकर यांच्यावरही मी काही आरोप केला नव्हता. काही गैरसमज झाल्याने शिवसेना सोडली होती. आता ते सर्व मोठय़ा मनाने विसरून उद्धव ठाकरे यांनी पुन्हा शिवसेनेत प्रवेश दिला आहे. राष्ट्रवादीत गेलो तरी मनातील शिवसैनिक गेला नव्हता. आता पुन्हा आपल्या घरी परतलो आहे,’’ असे भास्कर जाधव यांनी स्पष्ट केले. तर भास्कर जाधव स्वगृही परतल्याने शिवसेनेची ताकद वाढली असून त्यांचा योग्य तो सन्मान केला जाईल, असे उद्धव ठाकरे यांनी सांगितले.

शर्माही सेनेत

पोलीस दलातून स्वेच्छानिवृत्ती घेतलेले एन्काऊंटर स्पेशालिस्ट पोलीस अधिकारी प्रदीप शर्मा यांनी शुक्रवारी शिवसेनेत प्रवेश केला. एकनाथ शिंदे या वेळी हजर होते. नालासोपारा मतदारसंघातून त्यांना उमेदवारी देण्याबाबत चाचपणी सुरू आहे.

समाजकारणासाठी शिवसेनेत प्रवेश केल्याचे शर्मा म्हणाले. उद्धव ठाकरे हे मला लहान भावासारखे असल्याचे शर्मा बोलून गेले; पण चूक लक्षात येताच उद्धव हे भावासारखे आहेत, असे शर्मा म्हणाले. त्यानंतर उद्धव यांनीही त्यावरून शर्मा यांची फिरकी घेतली. नरेंद्र मोदी हे मला लहान भाऊ म्हणतात, त्यामुळे तुमचा नंबर कितवा हे ठरवा, असा टोला उद्धव यांनी लगावला.

संध्याकाळी सारवासारव

‘शिवसेनेचे उमेदवारही मुख्यमंत्रीच ठरवतील,’ या आधीच्या उद्गारांबाबत उद्धव यांनी संध्याकाळी सारवासारव केली. पोलीस अधिकारी प्रदीप शर्मा यांच्या शिवसेना प्रवेशाच्यावेळी ते बोलत होते. जागावाटपाबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अमित शहा आणि माझे सर्वासमोर ठरले. मी आकडेवारीबाबत काहीच बोललो नाही; पण सध्या एवढय़ा जागा देणार-तितक्या जागा देणार असे ऐकायला येत असल्यामुळेच मुख्यमंत्र्यांनीच शिवसेनेची यादी ठरवावी असे म्हणालो, असे स्पष्टीकरण उद्धव ठाकरे यांनी संध्याकाळी प्रदीप शर्मा यांच्या पक्षप्रवेशावेळी दिले. पुन्हा सांगतो, आमचे ठरले आहे, असेही उद्धव यांनी नमूद केले.

विमान आणि दुचाकी

भास्कर जाधव यांचा राजीनामा तातडीने विधानसभाध्यक्ष हरिभाऊ बागडे यांच्याकडे सोपवण्यासाठी शिवसेनेचे आमदार अनिल परब, सचिव मिलिंद नार्वेकर हे जाधव यांना घेऊन विमानाने औरंगाबादला गेले. त्याआधी जाधव यांना भेटण्यासाठी येत असताना औरंगाबाद येथे मोटार रेल्वे फाटकावर अडकल्याने बागडे यांनी लवकर पोहोचण्यासाठी चालत रूळ ओलांडला आणि नंतर दुचाकीवर मागे बसून प्रवास केला.