राज्यात सत्तेचं नवं समीकरण जुळण्याची शक्यता असून शिवसेनेला सत्ता स्थापनेसाठी काँग्रेस आणि राष्ट्रवादीकडून समर्थन मिळण्याची शक्यता आहे. यामुळे राज्यात शिवसेनेचा मुख्यमंत्री बसण्याची शक्यता आहे. मात्र शिवसेना मुख्यमंत्रिपदाची माळ कोणाच्या गळ्यात घालणार यावर पडदा कायम आहे. शिवसेनेने कोणत्याही नावाची अधिकृत घोषणा केलेली नसून उद्धव ठाकरेच अंतिम निर्णय घेतील असं सांगत आहेत. दुसरीकडे उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्र्याच्या पालखीत शिवसैनिक बसवायचा आहे असं म्हटलं होतं.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

शिवसेनेकडून मुख्यमंत्रीपदासाठी सध्या मुख्यत्वे पाच नावं चर्चेत आहेत. यामध्ये शिवेसना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, पहिल्यांदाच निवडणूक लढून आमदार म्हणून निवडून आलेले ठाकरे कुटुंबातील सदस्य आदित्य ठाकरे यांचं नाव आघाडीवर आहे. याशिवाय संजय राऊत, एकनाथ शिंदे आणि सुभाष देसाई यांची नावं प्रामुख्याने चर्चेत आहे. शिवसेनेने अधिकृतपणे घोषणा केल्यानंतरच यावरुन पडदा उठणार असून हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.

१) उद्धव ठाकरे
उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्री केलं जाईल अशी शक्यता व्यक्त केली जात आहे. त्यांच्या नावावर सहमती झाल्याचीही चर्चा आहे. तसंच समर्थन देणाऱ्या काँग्रेस, राष्ट्रवादीने त्यांच्यासमोर मुख्यमंत्रीपद सांभाळण्याची अट ठेवल्याचं सांगितलं जात आहे. मात्र मुख्यमंत्री झाल्यास उद्धव ठाकरे यांना पक्षाकडे योग्य ते लक्ष देण्यास वेळ मिळणार नाही. त्यामुळे उद्धव ठाकरे ही जबाबदारी स्विकारतील की नाही? याबद्दल साशंकता आहे.

२) आदित्य ठाकरे
आदित्य ठाकरे विधानसभा निवडणूक लढवून आमदार झाले आहेत. त्यांच्या निमित्ताने पहिल्यांदाच ठाकरे कुटुंबातील सदस्याने निवडणूक लढवली असून विजय मिळवला आहे. त्यांना मुख्यमंत्री करण्यात यावं अशी अनेक शिवसैनिकांची मागणी आहे. मात्र प्रशासकीय कामकाजाचा अनुभव नसणाऱ्या आदित्य ठाकरेंवर इतकी मोठी जबाबदारी टाकली जाईल का ? हे पहावं लागेल.

३) एकनाथ शिंदे
एकनाथ शिंदे हे शिवसेनेचे निष्ठावंत. त्यांच्याकडे महायुतीच्या सरकारमध्ये सार्वजनिक बांधकाम तसेच आरोग्य खातंही होतं. ठाणे जिल्ह्याचा एक दमदार नेता आणि शिवसेनेत दबदबा असलेला नेता म्हणून एकनाथ शिंदे यांच्याकडे पाहिलं जातं. उद्धव ठाकरे यांच्याशी त्यांचे अत्यंत विश्वासाचे संबंध आहेत. त्यांच्याकडे मुख्यमंत्रीपद आले तर ते या नव्या युतीची तारेवरची कसरत करण्यात खुबीने सांभाळू शकतील, असे बोलले जाते.

४) संजय राऊत
संजय राऊत एक कट्टर शिवसैनिक म्हणून ओळखले जातात. शिवसेनेचं मुखपत्र असणाऱ्या सामना दैनिकाचे संपादकदेखील ते आहेत. राज्यसभेत खासदार म्हणून कामगिरी करतानाही त्यांनी अनेकदा परखडपणे शिवसेनेची भूमिका मांडली आहे. गेल्या काही काळात ते अत्यंत लोकप्रिय ठरले आहेत. दिल्ली ते महाराष्ट्र असा दोन्हीकडील नेत्यांना सांभाळण्याची त्यांच्यात क्षमता आहे. भाजपाला जेरीस आणण्यात त्यांचा महत्त्वाचा वाटा होता आणि येत्या काळात भाजपाला शांत ठेवण्यासाठी मुख्यमंत्री म्हणून ते उत्तम प्रकारे बॅटिंग करु शकतील असं शिवसैनिकांचं मत आहे.

५) सुभाष देसाई
उद्योगमंत्री सुभाष देसाई हे उद्धव ठाकरे यांचे निकटवर्तीय म्हणून ओळखले जातात. शिवसेनेशी एकनिष्ठ राहिलेल्या नेत्यांमध्ये सुभाष देसाई यांचं आवर्जून नाव घेतलं जातं. एक महत्त्वाची बाब म्हणजे सुभाष देसाई शिवसेनेतील मुंबईचा चेहरा असून हा शिवसेनेसाठी महत्वाचा मुद्दा ठरु शकतो. सुभाष देसाई यांची संघटनात्मक बांधणीवर महत्वाची भूमिका राहिली आहे.

राज्यातील सत्तेचं समीकरण बदललं असल्याने मुंबई महापालिकेत काय होणार याकडेही सर्वाचं लक्ष आहे. महापालिकेत शिवसेना भाजपाच्या पाठिंब्याने सत्तेत आहे. जर भाजपाने शिवसेनेचा पाठिंबा काढून घेतला तर त्यांना काँग्रेसच्या पाठिंब्याची गरज लागणार आहे. कारण राष्ट्रवादीचे फक्त ९ नगरेसवक आहेत.

२२७ सदस्यांच्या महापालिकेत बहुमतासाठी ११४ चा आकडा गाठणं गरजेचं असून शिवेसनेला ३२ नगरसेवकांच्या पाठिंब्याची गरज असून काँग्रेसचे ३१ आणि राष्ट्रवादीचे ९ नगरसेवक यामध्ये महत्त्वाची भूमिका बजावतील. या सर्व घडामोडीत सुभाष देसाई महत्त्वाची भूमिका निभाऊ शकतात. तसंच 2022 मध्ये होणाऱ्या महापालिका निवडणुकीतही त्यांच्यावर महत्त्वाची जबाबदारी असेल. या सर्व परिस्थितीत त्यांना मुख्यमंत्री करण्याची शक्यता नाकारता येऊ शकत नाही.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Shivsena cm candidate uddhav thackeray aditya thackeray eknath shinde sanjay raut subhash desai sgy
First published on: 11-11-2019 at 19:13 IST