तासाभराच्या अंतराने सलग दुसरी पत्रकार परिषद घेऊन शिवसेना नेते संजय राऊत यांनी सत्तास्थापनेचे नवे संकेत दिले आहेत. काँग्रेस-राष्ट्रवादी यांच्यासोबत बोलणी कधी होणार? सत्ता कधी स्थापन होणार? भाजपासोबत जाणार का? अशा प्रश्नांची उत्तरे देताना राऊत म्हणाले की, आम्ही बहुमत सिद्ध करायला जाऊ तेव्हा सारे समोर येईलच. तेव्हा मीडियालाही बोलवूच..

राऊत म्हणाले, हे एका पक्षाचे सरकार नसेल. त्यामुळे हे सरकार स्थापन होण्यासाठी वेळ तर लागणारच. कारण वेगवेगळ्या विचारधारेचे पक्ष जेव्हा एकत्र येतात, तेव्हा विचारासाठी वेळ घ्यावाच लागतो. यापूर्वीही अशा प्रकारचे सरकार अनेक राज्यांमध्ये स्थापन झालेले आहे.

शरद पवारांच्या वक्तव्यावर राऊत काय म्हणाले?
काँग्रेस आणि राष्ट्रवादी या दोन्ही पक्षांची निवडणूकपूर्व आघाडी आहे. दोन्ही पक्ष मोठे आहेत. त्यांच्यासोबत काही मित्रपक्षही आहेत. त्यामुळे या दोन्ही पक्षांनी मित्रपक्षांशी चर्चा करणे गैर नाहीच. शरद पवार जे काल बोलले ते योग्यच आहे. त्यांना मित्रपक्षांशी चर्चा करूनच निर्णय घ्यावा लागेल.

काँग्रेस-राष्ट्रवादीशी कधी चर्चा करणार?
या प्रश्नावर राऊत यांनी उत्तर दिले की, लवकरच या दोन्ही पक्षांशी चर्चा होईल आणि त्यावेळी मीडियालाही बोलवू. उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्रिपद देण्यासाठी काँग्रेस-राष्ट्रवादी राजी आहेत का? असे विचारले असता राऊत यांनी स्पष्ट संकेत दिले की, आम्ही बहुमत सिद्ध करायला जाऊ तेव्हा सगळ्या गोष्टी स्पष्ट होतील.

काय केली भाजपावर टीका?
२०१४ मध्ये युती तुटली होती. त्यानंतर आम्हाला युतीत जायची इच्छा नव्हती. भाजपानं त्यांचा सर्वात मोठा मित्रपक्ष गमावला आहे. भाजपाच्या अंताची सुरूवात ही महाराष्ट्रातूनच होणार आहे. येत्या काळात भाजपाला याची मोठी किंमत चुकवावी लागेल.

पुन्हा केला १७० जणांच्या पाठिंब्याचा दावा
राज्यात लवकरच सरकार स्थापन होईल आणि त्याचं नेतृत्व हे शिवसेनाच करेल. शिवसेनेच्या नेतृत्वाखालीच स्थिर सरकार स्थापन होईल आणि यासाठी कोणाच्याही मध्यस्थीची गरज नाही. आम्ही विधीमंडळात बहुमत सिद्ध करताना १७० जणांचा पाठिंबा दाखवून देऊ. राष्ट्रपती शासन हे सहा महिन्यांसाठी लागू झालं आहे. ते संपण्यापूर्वी राज्यात सरकार स्थापन होईल, असंही ते म्हणाले.