सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर फडणवीस सरकारने मंगळवारी राजीनामा दिला आणि राज्यातील सत्तापेच सुटला. शिवसेना-राष्ट्रवादी-काँग्रेस या पक्षांसह इतर घटक पक्षांची महाविकास आघाडी स्थापन करण्यात येत असून, आघाडीच्या नेतेपदी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची निवड करण्यात येत असल्याचे या पक्षांच्या संयुक्त बैठकीत जाहीर करण्यात आले. त्यामुळे उद्धव ठाकरे हे राज्याचे नवे मुख्यमंत्री बनतील. त्यांचा शपथविधी गुरुवारी शिवाजी पार्कवर होणार आहे. या सर्व घडामोडींवर शिवेसना खासदार संजय राऊत यांनी ट्विट केलं असून एक शेर पोस्ट केला आहे.

भाजपासोबत मुख्यमंत्रीपदावरुन झालेल्या वादानंतर संजय राऊत यांनी आक्रमक भूमिका घेतली होती. शिवसेनेची बाजू आक्रमकपणे मांडण्यात शिवसेनेकडून संजय राऊत यांची मोठी भूमिका आहे. इतकंच नाही तर राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष शरद पवार यांच्यासोबत समन्वय साधण्याची जबाबदारीही त्यांनी योग्य रितीने पार पाडली. महाविकासआघाडीचं सरकार राज्यात स्थापन होण्यामध्ये शिवसेनेच्या बाजूने संजय राऊत यांचा मोलाचा वाटा आहे.

शिवसेना-राष्ट्रवादी-काँग्रेस या तीन पक्षांच्या महाराष्ट्र विकास आघाडी म्हणजेच महाविकास आघाडीच्या आमदारांची संयुक्त बैठक वांद्रे-कुर्ला संकुलातील ट्रायडेंट हॉटेलमध्ये मंगळवारी झाली. या बैठकीत महाविकास आघाडीचे नेते आणि मुख्यमंत्री म्हणून उद्धव ठाकरे यांची निवड राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या सूचनेनुसार करण्यात आली. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी उद्धव ठाकरे यांचे नाव सुचवणारा ठराव मांडला, तर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी त्यास अनुमोदन दिले. या नव्या आघाडीबद्दल उद्धव ठाकरे यांनी शरद पवार यांच्यासह सोनिया गांधींचे आभार मानले. या बठकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनीही मार्गदर्शन केले. या बैठकीनंतर तिन्ही पक्षांच्या नेत्यांनी राजभवनवर जाऊन सत्तास्थापनेचा दावा केला.

महाविकास आघाडीने मंगळवारी राज्यपालांकडे १६६ आमदारांच्या पाठिंब्याचे पत्र सादर केले. राज्यपालांनी आघाडीला ३ डिसेंबरपर्यंत विश्वासदर्शक ठराव मंजूर करून घेण्यास सांगितले आहे.