राष्ट्रवादी काँग्रेस प्रमुख शरद पवार यांनी काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांच्यासोबत सोमवारी झालेल्या बैठकीत राज्यातील सत्तास्थापनेवर कोणतीही चर्चा झाली नसल्याचा दावा करत सगळ्यांना बुचकळ्यात टाकलं आहे. मात्र सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, शिवसेना-राष्ट्रवादी आणि काँग्रेसचं एकत्रित सरकार स्थापन करण्याच्या निर्णयावर एकमत झालं असून पुढील महिन्यात दावा केला जाऊ शकतो. महत्त्वाचं म्हणजे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याकडे मुख्यमंत्रीपद सोपवलं जाणार आहे. इंडियन एक्स्प्रेसने यासंबंधी वृत्त दिलं आहे.

सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सर्व काही ठरल्याप्रमाणे झालं तर नव्या सरकारमध्ये काँग्रेस आणि राष्ट्रवादी दोघांचेही उपमुख्यमंत्री असतील. तसंच मुख्यमंत्रीपद वाटून घेण्यात येणार नाही यावरही एकमत झालं असून मुख्यमंत्रीपद पाच वर्षांसाठी उद्धव ठाकरेंकडे सोपवण्यात येणार आहे.

विधानसभेत असलेल्या संख्याबळाच्या आधार तिन्ही पक्षांमध्ये मंत्रीपद वाटून घेण्यात येणार असून यानुसार शिवसेनेकडे १५, राष्ट्रवादीकडे १४ आणि काँग्रेसकडे १३ मंत्रीपदं असणार आहेत. विधानसभा निवडणुकीत शिवसेने ५६, राष्ट्रवादी ५४ आणि काँग्रेस ४४ जागांवर विजयी झाली आहे. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, शिवसेनेने विधानसभा अध्यक्षपद कोणाकडे द्यायचा याचा निर्णय काँग्रेस आणि राष्ट्रवादीकडे सोपवला आहे. सध्या काँग्रेस नेते आणि माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांचं नाव चर्चेत आहे.

राज्यात बिगर भाजपा सरकार स्थापन व्हावं यासाठी शरद पवार पुढाकार घेत असल्याची सुत्रांची माहिती आहे. मात्र दिल्लीत सोनिया गांधी यांच्या भेटीनंतर पार पडलेल्या पत्रकार परिषदेत शरद पवारांनी कोणतीही माहिती उघड न करता पत्रकारांच्या प्रश्नांवर अजब उत्तर देत सर्वांना बुचकळ्यात टाकलं. शिवसेनेला पाठिंबा देण्याबाबत काँग्रेस पक्षाध्यक्षा सोनिया गांधी यांनी अद्यापही स्पष्ट भूमिका घेतलेली नसतानाच, सत्तास्थापनेबाबत भाजपला विचारा आणि सोनियांशी सत्तास्थापण्याच्या मुद्यावर चर्चाच झालेली नाही, अशी बुचकळ्यात टाकणारी विधाने शरद पवार यांनी केली.

दरम्यान शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे लवकरच दिल्ली दौरा करण्याची शक्यता आहे. दुसरीकडे सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, उद्धव ठाकरे यांनी २४ नोव्हेंबरचा आपला अयोध्या दौरा रद्द केला. हा दौरा काँग्रेस-राष्ट्रवादीसोबतच्या चर्चेत अडथळा निर्माण करणार ठरु शकतो यामुळेच हा दौरा रद्द करण्यात आला.

मुख्यमंत्रीपदासाठी शिवसेनेकडून एकनाथ शिंदे, सुभाष देसाई आणि आदित्य ठाकरे यांची नावं चर्चेत होती. मात्र सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, शरद पवार यांनी स्थिर सरकार हवं असेल तर उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रीपद स्विकारणं गरजेचं असल्याचं स्पष्ट केलं होतं. सुभाष देसाई आणि एकनाथ शिंदे मित्रपक्षांमध्ये आत्मविश्वास निर्माण करण्यात कमी पडतील तसंच आदित्य ठाकरे या पदासाठी खूपच तरुण असल्याने उद्धव ठाकरे योग्य व्यक्ती असतील यावर शरद पवारांचा भर होता.