27 September 2020

News Flash

…म्हणून आदित्य ठाकरेंनी आईला सर्वात मागे बसायला सांगितलं

युवासेना अध्यक्ष आदित्य ठाकरे यांनी वरळी मतदारसंघातून आपण विधानसभा निवडणूक लढणार असल्याचं जाहीर केलं आहे

युवासेना अध्यक्ष आदित्य ठाकरे यांनी वरळी मतदारसंघातून आपण विधानसभा निवडणूक लढणार असल्याचं जाहीर केलं आहे. आदित्य ठाकरे यांनी शिवसेनेच्या विजय संकल्प मेळाव्यात बोलताना स्वत: आपल्या उमेदवारीची घोषणा केली. यावेळी शिवसेनेचे ज्येष्ठ नेते मंचावर उपस्थित होते. उद्धव ठाकरे यावेळी अनुपस्थित राहिले, पण त्यांच्या पत्नी आणि आदित्य ठाकरेंची आई रश्मी ठाकरे उपस्थित होत्या. आदित्य ठाकरे यांनी यावेळी आपण आईला मागे बसायला सांगितलं असल्याचं सांगितलं.

आदित्य ठाकरे यांनी सांगितलं की, “जनआशीर्वाद यात्रेनंतर ४० एक मिनिटं बोलायची सवय झाली आहे. पण आज काही बोलायचं सुचत नव्हतं. म्हणून मी आईला सांगितलं मागे बस…आई दिसली की काय बोलायचं सुचत नाही”. यानंतर उपस्थित कार्यकर्ते आणि नेत्यांमध्ये हशा पिकला.

विधानसभा निवडणूक लढवणार, आदित्य ठाकरेंची घोषणा

“आपल्याला वरळीचा विकास करायचा आहे, मात्र सोबत महाराष्ट्रदेखील पुढे न्यायचा आहे. संपूर्ण महाराष्ट्र माझी कर्मभूमी आहे. फक्त वरळी नाही, तर संपूर्ण महाराष्ट्रासाठी काम करणार आहे,” असं आदित्य ठाकरे यांनी यावेळी बोलताना सांगितलं. माझ्यासाठी प्रत्येक गावात प्रचार केला पाहिजे असं आवाहन यावेळी आदित्य ठाकरे यांनी शिवसैनिकांना केलं. माझ्या विरोधात कोणी उमेदवार उभा राहिला तर आनंदाने त्याला राहू देत असं यावेळी आदित्य ठाकरेंनी सांगितलं.

“हा निर्णय माझ्या स्वप्नासाठी नाही तर जनतेसाठी घेतला आहे. आमदार, मुख्यमंत्री व्हायचं आहे म्हणून मी हा निर्णय घेतलेला नाही. जनतेचं स्वप्न साकार कऱण्यासाठी हा निर्णय घेतला आहे. फक्त निवडणूक नाही तर लोकांच्या न्याय-हक्कांचा लढा लढण्याची हीच वेळ आहे. बेरोजगारी संपवण्याची हीच वेळ आहे,” असंही यावेळी आदित्य ठाकरेंनी सांगितलं. “धर्म, जातीपातीचे सगळे भेदभाव संपवत एक नवा महाराष्ट्र निर्माण करण्याची हीच वेळ,” असल्याचंही ते म्हणाले.

“निवडणूक लढण्याच्या आपल्या निर्णयावर बोलताना आदित्य ठाकरेंनी देशात नवं काय घडवायचं असेल तर राजकारण एक चांगला मार्ग आहे. महाराष्ट्राची सेवा करायची असेल तर अजून ती कशी करु शकतो याचा विचार करत होतो. नगरसेवक, आमदार यांच्याकडे पाहून आपणही त्यांच्या खांद्याला खांदा लावून काम केलं पाहिजे असं वाटत होतं,” असं त्यांनी सांगितलं. मला अनेकजण राजकारणातच का गेला असं विचारत असतात, त्यावर मी इतर काहीही करु शकत नाही हे एकच उत्तर माझ्याकडे असतं असंही ते म्हणाले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 30, 2019 6:28 pm

Web Title: shivsena yuvasena aditya thackeray maharashtra assembly election 2019 sgy 87 2
Next Stories
1 VIDEO: अभिमानास्पद! असा आहे नौदलाचा समुद्रातला ‘एअरक्राफ्ट कॅरियर ड्राय डॉक’
2 शिवसेनेच्या माजी महापौर श्रद्धा जाधव बंडखोरीच्या तयारीत, वडाळा मतदारसंघ भाजपाला जात असल्याने नाराज
3 मुलुंड: भाजपामध्ये तिकीटासाठी रस्सीखेच, सहा जण इच्छुक
Just Now!
X