राज्यामधील विधानसभेच्या निकालाला १४ दिवस उलटून गेल्यानंतरही राज्यातील सत्ता स्थापनेचा तिढा सुटलेला नाही. भाजपाने वेट अ‍ॅण्ड वॉचची भूमिका घेतली आहे. तर दुसरीकडे युतीतील सर्वात मोठा मित्रपक्ष असणाऱ्या शिवसेनेने निवडणुकीआधी ठरलेल्या ५०-५० सुत्रानुसार अडीच वर्ष मुख्यमंत्री पद शिवसेनेला देण्याच्या मागणीवर अडून बसल्याचे चित्र दिसत आहे. याच पार्श्वभूमीवर आज भाजपाचे नेते राज्यपालांची भेट घेणार आहेत. त्याआधी भाजपाचे नेते सुधीर मुनगंटीवार यांनी मुंबईमध्ये पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेमध्ये त्यांना शिवसेनेचे आमदार फुटण्यासंदर्भात प्रश्न विचारला. यावर त्यांनी प्रतिक्रिया देताना असं होणं शक्य नसल्याचं म्हटलं आहे.

शिवसेना आमदारांच्या फोडाफोडीच्या शंकेवरून त्यांना मुंबईतील हॉटेलमध्ये हलवण्याच्या वृत्तावर मुनगंटीवार यांना प्रश्न विचारण्यात आला. यावर उत्तर देताना त्यांनी ‘शिवसेनेच्या आमदारांना कोणी फोडत नाही. शिवसेनेचे आमदार फुटणे शक्य नाही. सर्वच पक्षांचे सर्व आमदार हे सन्मानिय आहेत. लाखो लोकांचा जनाधार असल्याने ते निवडून आले आहेत. त्यामुळे असं फोडाफोडीचं राजकारण होईल असं वाटतं नाही,’ असे मत व्यक्त केले आहे. तसेच शिवसेना आणि भाजपाचे आमदार फुटण्याची शक्यता नसल्याचेही मुनगंटीवार यांनी सांगितलं. ‘दहा पंधार वर्ष सत्तेपासून लांब असतानाच शिवसेना आणि भाजपाचे आमदार फुटले नाहीत तर आता सत्ता समोर असताना ते कसे फुटतील,’ असं प्रतीसवाल मुनगंटीवार यांनी उपस्थित केला.

आणखी वाचा- शिवसेनेचे आमदार फोडण्याची कोणाची हिंमत नाही : संजय राऊत

तसेच शिवसेनेसोबत युती करावी, दुसरा पर्याय बघू नये असाच संदेश आम्हाला केंद्रातून देण्यात आला आहे असंही मुनगंटीवार यांनी स्पष्ट केलं. याच फोडाफोडीच्या राजकारणासंदर्भात शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी प्रश्न विचारण्यात आला त्यावेळी त्यांनी शिवसेनेचे आमदार फुटणे शक्य नाही असं मत व्यक्त केलं. “शिवसेनेच्या वाऱ्याला उभं राहायची हिंमत कोणीही करून दाखवावी. शिवसेनेच्या आमदारांच्या आसपास फिरकायची कोणाची हिंमत नाही. आमचे आमदार निष्ठावान आहेत. आमचे आमदार फुटणार नाहीत याची खात्री आहे. त्यांना संपर्क करण्याची कोणाची हिंमत नाही,” असं राऊत म्हणाले.