केंद्राने राज्याला दिलेल्या ४० हजार कोटींचा निधी परत पाठवण्यासाठी देवेंद्र फडणवीस यांना मुख्यमंत्री करण्यात आल्याचा दावा भाजपा खासदार अनंतकुमार हेगडे यांनी केला आहे. मात्र फडणवीस यांनी हा दावा फेटाळून लावला आहे. असं असलं तरी या दाव्यावरुन सत्ताधाऱ्यांनी फडणवीस यांच्यावर टीकास्र सोडले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार सुनील तटकरे यांनी खरोखरच केंद्राने राज्य सरकारकडे पाठवलेला ४० हजार निधी परत पाठवला असेल तर ही दुख:द आणि खेदजनक बाब असल्याचं म्हटलं आहे.

“खरच फडणवीस यांनी केंद्राकडे निधी परत केला असेल तर हे खपवून घेतलं जाणार नाही. ही खेदजनक बाब आहे. राजकारण जिथे करायचंय तिथे नक्की करावं. पण महाराष्ट्रातील शेतकरी सर्वसामान्य मजूर गरीब असून त्याला मदत मिळण्याच्या बाबातीत कोणी राजकारण करत असेल तर त्याचा निषेधच करायला हवा,” असं मत तटकरे यांनी व्यक्त केलं आहे. “महाराष्ट्राच्या हिताची जपवणूक करण्यासाठी आज सर्वांना एकत्र येऊन काम करण्याची आवश्यकता आहे. उद्धव ठाकरेंनी पंतप्रधानांना भेटणार असल्याचं सांगितलं. विरोधी पक्षनेते फडणवीस आणि मोदींचे जवळचे संबंध आहेत. सर्व पक्षीय शिष्ठमंडळामध्ये आम्ही देवेंद्रजींनाही घेऊन जाऊ असंही मुख्यमंत्री म्हणाले. हीच महाराष्ट्राची संस्कृती आहे,” असंही तटकरे यावेळी बोलताना म्हणाले.

शेतकऱ्याला मदत करणे हे पहिलं उद्दीष्ट असलं पाहिजे असंही तटकरे यावेळी म्हणाले. “केंद्राकडून येणारे पैसे महाराष्ट्राला मिळालेच पाहिजेत कारण महाराष्ट्रामध्ये परतीच्या पावसामुळे जी परिस्थिती निर्माण झाली आहे त्यामुळे शेतकरी संपूर्णपणे उद्धवस्त झाला आहे. अशावेळेस राज्यात कोणते सरकार काम करतयं, कोण मुख्यमंत्री आहे यापेक्षा राज्याच्या हिताची जपवणूक करण्याचा निर्णय केंद्र सरकारने केला पाहिजे,” असं मत तटकरेंनी व्यक्त केलं. तसेच शरद पवार हे राज्यातील शेतकऱ्यांना मदत करण्यासंदर्भात पंतप्रधान नरेंद्र मोदींना भेटतील अशी आशाही तटकरेंनी व्यक्त केली. याबद्दल बोलताना तटकरेंनी “देशातील मोठे नेते असणारे शरद पवार याबद्दल स्पष्टपणे केंद्राकडे भूमिका कळवतील अशी आशा आहे. यासंदर्भात पवार पंतप्रधानांना भेटतील. ४० हजार कोटींच नाही तर त्याहून अधिक मदत महाराष्ट्राला लागली तर ती मिळवण्याची क्षमताही पवारांमध्ये आहे. या विषयाचे राजकारण करता कामा नये,” असं म्हटलं आहे. तसेच ‘हेगडेंच्या या वक्तव्यावरुन देवेंद्र फडणवीसांबद्दल राज्यातील जनतेच्या मनामध्ये साशंकता निर्माण होण्याची शक्यता आहे’, असा अंदाजही तटकरेंनी व्यक्त केला आहे.

काय म्हणाले हेगडे

केंद्र सरकारचा ४० हजार कोटींचा निधी राज्याच्या मुख्यमंत्री कार्यालयाकडे पडून असून महाविकास आघाडीचे सरकार सत्तेत आल्यास ते विकासाच्या नावाखाली या निधीचा गैरवापर करतील म्हणून देवेंद्र फडणवीस यांना चार दिवसांचे मुख्यमंत्री करण्यात आले होते. तसेच मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर १५ तासांमध्ये त्यांनी हा निधी पुन्हा केंद्राकडे पाठवून दिल्याचा दावा हेगडे यांनी कर्नाटकात एका कार्यक्रमात बोलताना केला होता. हेगडेंच्या या विधानामुळे राज्यात खळबळ उडाली असून अनेक राजकीय प्रतिक्रिया येत आहेत.