विधानसभा निवडणुकीत राज्यात काँग्रेस पिछाडीवर पडल्याचे चित्र असताना काँग्रेसचे नेते राहुल गांधीही प्रचारापासून दूर असल्याची चर्चा सुरू आहे. राहुल गांधी यांच्या नेतृत्वावरून होत असलेल्या आरोपांना काँग्रेसचे नेते सुशिलकुमार शिंदे यांनी उत्तर दिलं आहे. “राहुल गांधींची विरोधी पक्षांसह काहीजणांकडून हेटाळणी केली जाते. काँग्रेसच्या नेतृत्वाविषयी भाजपा आणि आरएसएस पिल्लू सोडण्याचं काम केलं जातं,” अशी टीका सुशिलकुमार शिंदे यांनी केली.

“काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस दोन्ही एकाच आईची लेकरं आहेत. त्यामुळे दोन्ही काँग्रेस एक होणार आहे, असं विधान सुशिलकुमार शिंदे यांनी केलं होतं. त्यांच्या या वक्तव्यावरून दोन्ही काँग्रेसच्या चर्चांना उधाण आले आहे. तर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि अजित पवार यांनी विलिनीकरण करणार नसल्याचे स्पष्ट केलं आहे. यासंदर्भात आणि राहुल गांधी यांच्या नेतृत्वाविषयी सुशिलकुमार शिंदे यांनी एबीपी माझाला दिलेल्या मुलाखतीत उत्तरे दिली आहे. ते म्हणाले,”दोन्ही काँग्रेसकडे विलिनीकरणाशिवाय पर्याय नाही. पक्ष टिकवणं ही आजच्या परिस्थितीची गरज आहे. सर्व नेते काम करत आहे. ते आपल्या मतदारसंघात काम करत आहे. कारण आमच्या जागा टिकवल्या नाही, तर किंमत कोण करणार,” असं ते म्हणाले. राहुल काँग्रेसपासून दूर जात असल्याच्या प्रश्नावर सुशिलकुमार शिंदे म्हणाले,”राहुल गांधी काँग्रेसपासून दूर गेलेले नाही. प्रचारासाठी महाराष्ट्रात येणार आहे. १३ ते ऑक्टोबर दरम्यान ते राज्याच्या दौऱ्यावर आहेत. काही वेळेला काम निघतातं. त्यामुळे बाहेर जावं लागतं. माझ्या निवडणुकीवेळी काम निघाल्याने मी पाच दिवस अमेरिकेत गेलो होतो. राहुल गांधी खूप हुशार आहे. हळूहळू ते समोर येईलच. विरोधकांची हेटाळणी करण्याचं काम होतं आहे. भाजपा आणि आरएसएस हे पिल्लू सोडत असते. इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी यांच्यासोबतही असं झालं. पण, त्यांनी सिद्ध केलं. सोनिया गांधींवर टीका झाली. त्यांनी दहा वर्ष काँग्रेसचं सरकार चालवलं,” असं शिंदे यांनी सांगितलं.

मुंबई काँग्रेसचे माजी अध्यक्ष संजय निरूमप यांच्यावरही त्यांनी नाव न घेता टीका केली. “स्वतः उमेदवारांना तिकीट मिळाले म्हणून काहीजण बोलत आहेत. त्यांनी आधी बोलायला हवं होतं. ज्याची गरज नाही. त्यांना बाजूला काढलं जातं. मुंबई काँग्रेसला नवीन अध्यक्ष दिला आहे,” असं शिंदे म्हणाले.