|| जयेश सामंत

ठाणे जिल्हा शिवसेनेचा बालेकिल्ला. या बालेकिल्ल्यात आता शिवसेनेच्या मित्रपक्षानेही आपल्या पक्षाचा विस्तार वाढविण्यास सुरुवात केली आहे. हे दोन्ही पक्ष समसमान म्हणजेच १८ पैकी प्रत्येकी ९ जागांवर निवडणूक लढवीत असून कल्याणमध्ये दोन्ही पक्षांपुढे बंडखोरांचे आव्हान आहे. तसेच आगामी काळात पक्ष कोणत्या विकासकामांना प्राधान्य देणार आहे. या सर्व प्रश्नांची उत्तरे देतानाच शिवसेनेचे नेते  एकनाथ शिंदे यांनी बंडखोरांमुळे नुकसान होणार नसल्याचा दावा केला.

 कल्याण पूर्व आणि पश्चिममध्ये युतीत बंडखोरी झाली असून त्यापैकी पूर्वेतील शिवसेनेतील बंडखोरी तुम्ही रोखू शकत होतात. मात्र, तुम्ही ती रोखू शकला नाहीत, याचे कारण काय?

राजकारणात येणाऱ्या प्रत्येक कार्यकर्त्यांला निवडणूक लढवण्याची इच्छा असते. त्यात काही चुकीचे नाही. पक्षावर प्रेम करणाऱ्या, पक्षासाठी काम करणाऱ्या प्रत्येकाला आपल्या पक्षाने जास्तीत जास्त जागा लढवाव्यात, असे वाटत असते. परंतु, दोन किंवा जास्त पक्षांनी युतीचा निर्णय घेतल्यानंतर काही जागांवर तडजोड करावी लागते. काही ठिकाणी दुदैवाने बंडखोरी झाली, परंतु महायुतीचे अधिकृत उमेदवारच सगळीकडे जिंकून येतील.

 यंदा निवडणुका प्रत्यक्षात सुरू झाल्या तरी खड्डय़ांची आणि वाहतूक कोंडीची समस्या कायम आहे. ?

पावसामुळे खड्डे बुजवण्याच्या कामात सातत्याने अडथळे येत आहेत. मी स्वत: सप्टेंबर महिन्याच्या अखेरच्या आठवडय़ात जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक घेऊन खड्डे बुजवण्याचे आदेश दिले होते. त्यानंतर काम सुरूदेखील झाले होते. मात्र, पुन्हा पावसाने जोर धरला. आता पुन्हा खड्डे बुजवण्याचे काम वेगाने हाती घेण्यात आले आहे.

ठाणे जिल्ह्य़ासाठी तुमचे काय व्हिजन आहे?

ठाणे जिल्हा हा झपाटय़ाने नागरीकरण होत असलेला जिल्हा आहे. नागरीकरणाच्या रेटय़ामुळे येथील सोयीसुविधांवर ताण येत आहे. याचा र्सवकष विचार करून गेली काही वर्षे ठाण्यातील शिवसेना व भाजपचे लोकप्रतिनिधी सातत्याने विविध विकास प्रकल्पांसाठी सरकारकडे मागणी करत होते. क्लस्टर डेव्हलपमेंट. मेट्रो, स्वतंत्र धरण, रस्ते रुंदीकरण अथवा नवे रस्ते, विस्तारित ठाणे स्थानक, सुपरस्पेशालिटी रुग्णालय, या सर्व प्रकल्पांना गेल्या पाच वर्षांच्या युती सरकारच्या राजवटीत मंजुरी मिळवली. हे सर्व प्रकल्प आगामी काळात पूर्ण करून ठाणे जिल्ह्य़ालापहिल्या क्रमांकावर आणण्याचा निर्धार आहे.

शिवसेना आणि भाजप हे दोन्ही पक्ष अनेक ठिकाणी मित्रपक्ष कमी आणि प्रतिस्पर्धी जास्त दिसू लागले आहेत..

राजकारणात प्रत्येक पक्षाला विस्ताराची महत्त्वाकांक्षा असते. त्यात काही गैर नाही. प्रत्येक नेता आपापल्या पक्षाच्या वाढीसाठी प्रयत्न करत असतो. त्याच वेळी अनेकदा व्यापक हितासाठी युती अथवा आघाडी करण्याचाही निर्णय पक्ष करतात. शिवसेना-भाजपची युती ही आजची युती नाही. ही तत्त्वाच्या आधारावर, समान मूल्यांच्या आधारावर झालेली युती आहे. शिवसेनाप्रमुख स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे, अटलबिहारी वाजपेयी, लालकृष्ण अडवाणी, प्रमोद महाजन, गोपीनाथ मुंडे यांसारख्या त्या वेळच्या नेत्यांनी राज्याच्या आणि राष्ट्राच्या व्यापक हितासाठी, हिंदुत्वासाठी केलेली ही युती होती. याच विचाराने उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली आजही हे दोन्ही पक्ष एकत्र आहेत.

तुम्ही मुख्यमंत्र्यांचे विश्वासातले असे मानले जाते. ठाणे जिल्ह्य़ातील जागावाटपात तुमची ही जवळीक भाजपच्या फायद्याची ठरली अशी ही चर्चा आहे. विशेषत नवी मुंबईतील दोन्ही जागांच्या बाबतीत तडजोड अनेकांना रुचलेली नाही.

युतीसंदर्भात स्वत: पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यात संवाद होत होता. याचा निर्णय पक्षनेतृत्वाने राज्याच्या, पक्षाच्या व्यापक हिताचा विचार करून घेतला आहे. त्यासंदर्भात माझ्यासारख्या सामान्य कार्यकर्त्यांने काही मत व्यक्त करणे योग्य ठरणार नाही.