देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला आहे. देवेंद्र फडणवीस यांनी राज्यपालांकडे शुक्रवारी संध्याकाळी साडेचारच्या सुमारास आपला राजीनामा सोपवला. त्यानंतर फडणवीस यांनी सह्याद्री अतिथीगृहामध्ये पत्रकार परिषद घेऊन शिवसेनेबद्दलची नाराजी उघडपणे व्यक्त केली. या पत्रकार परिषदेमध्ये त्यांनी अनेक मुद्द्यांवर भाष्य केले. त्यांच्या पत्रकार परिषदेतील हे दहा महत्वाचे मुद्दे

१)
अडीच अडीच वर्षाचा प्रस्ताव नाही

अडीच-अडीच वर्षे हा फॉर्म्युला ठरलेलाच नाही, हे मी आजही सांगतो आहे. अडीच वर्षांच्या फॉर्म्युल्यावर आमची बोलणी फिस्कटली होती त्यानंतरच्या माझ्यासमोरच्या एकाही चर्चेत हा विषय झाला नाही. उद्धव ठाकरे आणि अमित शाह यांच्यात जर विषय झालेला असेल तर मला माहित नव्हतं. मी तसं अमित शाह आणि नितीन गडकरी यांना विचारलं मात्र त्यांनीही असं काहीही ठरलेलं नाही असं सांगितलं. या संदर्भातले समज-गैरसमज चर्चेने सोडवता आले असते. मात्र शिवसेनेने आमच्याशी चर्चाच केली नाही. मित्रपक्षाशी चर्चा करण्याऐवजी ते काँग्रेस राष्ट्रवादीशी चर्चा केली. ज्यांच्या विरोधात निवडणूक लढवली त्यांच्याशी शिवसेनेने चर्चा केली. मात्र त्यांना आमच्याशी चर्चा करावीशी वाटली नाही.

२)
युती तुटलेली नाही

आम्ही महायुतीसाठी अद्यापही तयार आहेत. त्यामुळे युती तुटली आहे असं मी म्हणणार नाही. आमची खंत मात्र दूर व्हायला हवी त्यानंतर शिवसेनेशी चर्चा होईल. आम्ही आजूनही चर्चेसाठी तयार आहोत, त्यामुळे आमच्यातील मतभेद दूर झाल्यास मिळून सरकार स्थापन करु.

३)
सत्तेत बसून टीका सहन होणार नाही

सत्तेत असतानाही शिवसेनेकडून वारंवार पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि इतर बड्या नेत्यांवर टीका केली जात होती. हे आम्हाला मान्य नाही. अशी टीका सहन केली जाणार नाही. विरोधी पक्षातील नेत्यांनी केलेली वक्तव्य आम्ही समजू शकतो. पण आमच्या सोबत केंद्रात आणि राज्यातही राहायचं आणि खालच्या पातळीवर टीकाही करायची, हे चालणारं नाही.

४)
आजूबाजूची लोकं दरी वाढवणारी विधाने करतात

उद्धव ठाकरेंच्या आजूबाजूची लोकं ज्याप्रकारे वक्तव्य करत आहेत, त्यांनी सरकार होत नसतं, आम्हाला उत्तर देता येत नाही, असं समजू नये. जबरदस्त भाषेत उत्तर देण्याची क्षमता आमच्यातही आहे, पण आम्ही देणार नाही. आम्ही जोडणारे आहोत, तोडणारे नाही. त्यांच्या अशा वक्तव्यांमुळेदोन्ही पक्षांमध्ये दरी निर्माण होते.

५)
उद्धव यांचे ते विधान धक्कादायक

विधानसभेच्या निकालाच्या दिवशी शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी घेतलेल्या पत्रकार परिषद घेतली. पहिल्याच पत्रकार परिषदेमध्ये त्यांनी सत्ता स्थापनेसाठी सर्व पर्याय खुले असल्याचे वक्तव्य केले. त्यांनी केलेले हे वक्तव्य आमच्यासाठी धक्कादायक होते.

६)
माझा फोन उचलला नाही

गेली पाच वर्षे उद्धव ठाकरे यांचे आणि माझे चांगले संबंध आहेत. अनेकदा मी त्यांच्याशी चर्चा नाही. मी स्वतः उद्धव ठाकरेंना फोन केले पण त्यांनी ते उचलले नाही. चर्चेची दारं आमच्याकडूून खुली होती. भाजपासोबत चर्चाच करायची नाही हे धोरण शिवसेनेचे आहे आमचे नाही. दिवसातून अनेकदा शिवसेनेची काँग्रेस आणि राष्ट्रवादीशी चर्चा व्हायची. मात्र आमच्यासोबत चर्चा करण्यात शिवसेनेला रस नव्हता. काही मुद्दे असतील तर ते चर्चेने सुटले असते मात्र शिवसेनेने चर्चा करण्याची तयारी दाखवली नाही.

७)
आम्ही कधी विरोधी विधान केला नाही

आम्ही तोडणारी नाही जोडणार लोक आहोत. आम्ही आमची मर्यादा कधीच ओलांडली नाही. आम्ही उद्धवजींबद्दल एकही वक्तव्य केलं नाही. गेल्या दहा दिवसात नरेंद्र मोदींवर ज्या खालच्या दर्जाची टीका झाली. त्यामुळे अशा सरकारमध्ये सोबत रहाव का? हा प्रश्न माझ्या मनात आहे.

८)
शिवसेनेशी युती का केली?

हिंदुत्व या एकमेव मुद्द्यावर आम्ही पुन्हा युती करण्याचा निर्णय घेतला. मात्र जेव्हा युतीची चर्चा झाली तेव्हा व्यक्तीगत टीका केली जाणार नाही यासंदर्भात आमची त्यांच्याशी चर्चा झाली होती. त्यावेळी त्यांनी अशाप्रकारची टीका केली जाणार नाही असं स्पष्ट केलं होतं.

९)
काळजीवाहू मुख्यमंत्री

मी आज दुपारी राज्यपालांकडे माझ्या मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा सुपूर्द केला. मात्र राज्यपालांच्या सांगण्यावरून काळजीवाहू मुख्यमंत्री म्हणून मी यापुढे काम करणार आहे.

१०)
घोडेबाजाराचा आरोप करणाऱ्यांना आव्हान

भाजपा सरकार तयार करताना कोणतंही फोडाफोडीचं राजकारण करणार नाही. आरोप करणाऱ्यांनी पुरावे द्यावे, अन्यथा माफी मागावी.