जनाठे यांना प्रचारासाठी उघड पाठिंबा; बोईसरमध्ये शिवसेनेची कोंडी

शिवसेना-भाजप यांची युती असतानाही बोईसरमध्ये शिवसेनेच्या अधिकृत उमेदवाराविरोधात बंडखोरी करणाऱ्या संतोष जनाठे यांना भाजपच्या स्थानिक पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी जाहीर पाठिंबा दिला आहे. जनाठे यांनी भाजपच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिला असला तरी पक्षाचे स्थानिक पदाधिकारी जनाठे यांच्याच पाठीशी आहेत. जनाठे यांचा उघड प्रचार भाजपच्या स्थानिक पदाधिकारी- कार्यकर्त्यांनी सुरू केल्याने शिवसेनेची कोंडी झाली आहे.

बोईसर विधानसभेची उमेदवारी महायुतीने भाजपला सोडावी यासाठी पालघरमधील भाजपच्या नेत्यांनी पक्षाकडे जोरदार मागणी केली होती. मात्र निवडणुकीच्या तोंडावर शिवसेनेने बहुजन विकास आघाडीचे आमदार आपल्याकडे पक्षांतर करून आणल्यानंतर भाजपच्या इच्छुक उमेदवारांचे स्वप्नभंग झाले. युतीने बोईसरची उमेदवारी शिवसेनेला दिल्याने भाजपचे इच्छुक उमेदवार संतोष जनाठे यांनी बंडखोरी करत अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला. बजरंग दल, विश्व हिंदू परिषद आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यकर्त्यांना एकत्रित घेऊन संतोष जनाठे यांनी अर्ज भरताना मोठे शक्तिप्रदर्शन केले होते. यातच महायुतीच्या बोईसर येथे पार पडलेल्या सभेत भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी आपण युतीचे काम करणार असल्याचे जाहीर करून शिवसेनेच्या उमेदवाराचा प्रचार करण्याचे स्थानीय पदाधिकारी व कार्यकर्त्यांना सांगितले होते. मात्र प्रचार सुरू होताच भाजपच्या अनेक वरिष्ठ पदाधिकाऱ्यांनी थेट अपक्ष उमेदवार संतोष जनाठे यांच्या प्रचारात उतरून शिवसेनेला कोंडीत पकडले आहे.

पालघर जिल्ह्य़ातील मुख्य चारही विधानसभा क्षेत्रे शिवसेनेला मिळाली असल्याने भाजपच्या पदाधिकाऱ्यांची मोठी अडचण निर्माण झाली आहे. येणाऱ्या काळात शिवसेना आपल्याला डोईजड होईल या भीतीपोटी भाजपच्या नेत्यांनी अपक्ष उमेदवार संतोष जनाठे यांना निवडून आणण्याचा विडा उचलला आहे.

बोईसर भाजपचे मंडळ अधिकारी आणि बोईसरमधील प्रमुख विकासक महावीर जैन यांनी प्रचाराची धुरा खांद्यावर घेतली आहे. गुरुवारी बोईसर येथील प्रचार कार्यालयाचे उद्घाटन करताना भाजपच्या राज्य सचिव अर्चना वाणी, जिल्हा परिषद सदस्या रंजना संखे, मंडळ अध्यक्ष प्रमोद आरेकर, ज्येष्ठ नेते लाला वाजपेयी आदी पदाधिकारी उघडपणे कार्यालयाच्या उद्घाटन कार्यक्रमात सहभागी झाल्याने मुख्यमंत्र्यांच्या सूचनांची पायमल्ली होत असल्याचे दिसून आले आहे. यामुळे शिवसेनेची डोकेदुखी वाढत चालली असून सेनेचे बोईसरमधील शिवसेनेचे मातब्बर नेते हताश झालेले पाहायला मिळत आहे.

संपर्कप्रमुखांची कसरत

शिवसेनेला बोईसरमध्ये भाजपने उघडपणे टक्कर दिली असल्याने बोईसरच्या शिवसेनेमधील नाराज मंडळींना आपल्याकडेच खेचून ठेवण्यासाठी सेनेच्या संपर्कप्रमुखांना कसरत करावी लागत आहे. शिवसेना आमदार रवींद्र फाटक यांना बोईसरमध्ये लक्ष केंद्रित करावे लागत असून पक्षातील वरिष्ठ नेत्यांचे बोईसरकडेच लक्ष लागले आहे. मनाने विखुरलेल्या नेत्यांना एकत्र करण्याचे काम आता ठाण्याच्या सुभेदारांना करावे लागत आहे.