स्थायी समितीचे सहा सदस्य रिंगणात असल्याने बैठकीत शुकशुकाट

निवडणुकीच्या आचारसंहितेमुळे आधीच मुंबई महापालिकेचे कामकाज ठप्प झालेले आहे. त्यातच पालिकेच्या स्थायी समितीचे सहा सदस्य निवडणुकीच्या रिंगणात असल्यामुळे एकूणच पालिका मुख्यालयात व स्थायी समितीमध्येही गेल्या दोन आठवडय़ांपासून शुकशुकाट पसरला आहे.

मुंबईतील विधानसभेच्या ३६ जागांसाठी होत असलेल्या निवडणुकीत पालिकेतील १० नगरसेवक आमदारकीच्या रिंगणात आहेत.  यापैकी  ९ नगरसेवकांना पक्षाकडून अधिकृत उमेदवारी देण्यात आली, तर दोन नगरसेवकांनी अपक्ष म्हणून निवडणुकीचा अर्ज भरला. स्वत: महापौर विश्वनाथ महाडेश्वर हे निवडणुकीत आपले नशीब अजमावत असल्यामुळे महापौर दालनातील कर्मचाऱ्यांनाही सध्या आराम आहे. स्थायी समितीवरील सहा सदस्यांचाही यात समावेश आहे. याव्यतिरिक्त शिवसेनेचे दिलीप लांडे (चांदिवली), काँग्रेसचे जगदीश कुट्टी (अंधेरी पूर्व), मनसेचे संजय तुर्डे (कलिना) हेदेखील निवडणूक लढवत आहेत. त्याचबरोबर जे नगरसेवक प्रत्यक्ष निवडणूक लढवत नाहीत त्यांना पक्षाने प्रचाराची जबाबदारी दिली आहे. त्यामुळे नगरसेवक सध्या प्रभाग कार्यालयात व मुख्यालयाकडे फिरकतही नाहीत. विविध वैधानिक समित्यांचे कामकाज हे  काही मिनिटांत संपवले जात आहे.

नगरसेवकांना एकाच फेरीच सगळ्या सभांना हजेरी लावता यावी म्हणून मंगळवारी पालिकेत स्थायी समिती, शिक्षण समिती व बाजार उद्यान समिती अशा तीन सभा आयोजित करण्यात आली होती. मात्र गणसंख्येअभावी बाजार उद्यान समितीची सभा तहकूब करावी लागली, तर शिक्षण समितीची सभा अक्षरश: काही मिनिटांत संपवली.

निवडणूक लढवणाऱ्या नगरसेवकांमध्ये सहा जण स्थायी समितीचे सदस्य आहेत. यामध्ये रमेश कोरगावकर (शिवसेना), राजूल पटेल (अपक्ष), रईस शेख (सपा), पराग शहा (भाजप), गीता गवळी (अखिल भारतीय सेना), आसिफ झकेरिया (काँग्रेस) यांचा समावेश आहे, तर खुद्द अध्यक्ष यशवंत जाधव यांच्या पत्नी माजी नगरसेविका यामिनी जाधव यादेखील निवडणूक लढवत आहेत. त्यामुळे मंगळवारी तब्बल दीड तास उशिराने सुरू झालेल्या सभेत केवळ शिवसेनेचे नगरसेवक उपस्थित होते. अजेंडय़ावरील विषय आचारसंहितेमुळे विचारात घेण्यात आलेच नाहीत.