जुन्या वैरामुळे बेलापूर-ऐरोली मतदारसंघातील मताधिक्य घटणार?

नवी मुंबईतील बेलापूर आणि ऐरोली विधानसभा युतीच्या वाटाघाटीत भाजपच्या वाटय़ाला येऊनही गेली अनेक वर्षांचे हाडवैर असलेले माजी मंत्री गणेश नाईक आणि विद्यमान आमदार मंदा म्हात्रे हे एकाच पक्षात आहेत. त्यांचे अद्यापही मनोमीलन होत नसल्याने त्याचा परिणाम दोन्ही मतदारसंघांतील भाजपच्या मताधिक्यावर होणार असल्याचे स्पष्ट दिसून येत आहे.

मागील निवडणुकीत युती नसल्याने भाजप आणि शिवसेनेचे उमेदवार एकमेकांसमोर ठाकले होते. यात दोघांनी मिळून एक लाख सहा हजार मते मिळवली होती. त्यात आता नाईकांच्या राष्ट्रवादी काँग्रेसची भर पडणार असल्याचे मानले जात आहे. त्यामुळे ही मतसंख्या एक लाख ४० हजारांपर्यंत जाण्याची अपेक्षा भाजपचे पदाधिकारी व्यक्त करीत आहेत.

गणेश नाईक यांना भाजपमध्ये प्रवेश देऊ नये, यासाठी म्हात्रे यांनी कसून प्रयत्न केले होते. मात्र म्हात्रे यांचा हट्ट पक्षाने जुमानला नाही. नाईक यांना पक्ष ठाणे जिल्ह्य़ाचे नेतृत्व म्हणून स्वीकारत असून बेलापूर मतदारसंघासाठी नाही, अशा शब्दांत म्हात्रे यांना भाजपच्या नेत्यांनी समज दिली होती. त्यानंतर नाईक यांना उमेदवारी न देऊन पक्षाने म्हात्रे यांची मर्जी सांभाळली आहे.

नाईक आणि म्हात्रे यांच्या चर्चा, संवाद, भेटीगाठी झालेल्या नाहीत. राष्ट्रवादीत असताना नाईक यांनी छळ केल्याची म्हात्रे यांची भावना आहे. राष्ट्रवादीतील पक्षश्रेष्ठींकडे तक्रारी करणे इतकेच काम म्हात्रे यांनी केले होते, अशी टीका नाईक सर्मथकांची आहे. म्हात्रे यांच्या मुलाला एक साधी पालिका निवडणुकीची उमेदवारी न दिल्याने हा राग विकोपाला गेला. त्यात नीलेश म्हात्रे यांच्या एका स्थायी समिती सभापती निवडणुकीतील पराभवाला नाईक कारणीभूत असल्याची सल म्हात्रे यांच्या मनात कायम आहे.

त्यामुळे मागील निवडणुकीत म्हात्रे यांनी राष्ट्रवादी सोडून भाजपमध्ये प्रवेश केला. आता त्याच ठिकाणी नाईक आल्याने पुन्हा या दोन नेत्यांचे शह-काटशहचे राजकारण सुरू आहे. यात भाजपने मंदा म्हात्रे यांना पुन्हा उमेदवारी दिल्याने त्या खूश आहेत, तर नाईकांनी ऐरोलीतून निवडणूक लढविण्याचा निर्णय घेऊन विरोधकांना शह दिला आहे. राज्यात युती झाल्याने बेलापूर मतदारसंघात दोन्ही पक्षांचे मागील निवडणुकीतील मतांची बेरीज एक लाख सहा हजार घरांच्या वर आहे, मात्र शिवसेनेचे शहरप्रमुख विजय माने यांनी म्हात्रे यांच्या विरोधात बंड पुकारल्याने शिवसेनेतील काही स्थानिक नेत्यांची याला फूस असल्याचे दिसून येत आहे. म्हात्रे यांचा ‘विजय’ भविष्यातील आपले राजकारण संपविणारा असल्याने माने यांना खो घालण्यात आला आहे. त्यामुळे म्हात्रे यांच्या युती धर्मातील मतांची संख्या कमी होण्याची शक्यता आहे. नाईक यांच्या सोबत बेलापूर मतदारसंघातील २०हून अधिक नगरसेवक भाजपमध्ये आले आहेत. त्यांनी म्हात्रे यांच्यासाठी प्रामाणिक काम केले तर २० ते २५ हजार मते मिळू शकणार आहे.

नाराजीचा फटका बसणार

नाईक आणि म्हात्रे यांच्या भांडणाचा अनेक नेते फायदा घेणार आहेत. एकेकाळचे गुरू नाईक यांना ताकद देण्याच्या बदल्यात चौगुले यांनी आगामी महापौरपदासाठी मुलाची मोर्चेबांधणी केली आहे. या शहरातील महापौर ठरविण्याचा हक्क गेली २५ वर्षे नाईकांकडे आहे. तो पुढच्या वर्षीच्या निवडणुकीतही कायम राहील असे दिसून येते. नाहटा व म्हात्रे यांच्यात वाद आहे. अगोदरच नाराज झालेले नाहटा म्हात्रे यांच्यासाठी मनापासून काम करण्याची शक्यता कमी आहे. नाईकांच्या मतदारसंघात कोळी समाजाचे आमदार रमेश पाटील आहेत. त्यांच्या ताकदीला नाईक दुर्लक्षित करीत असल्याचे दिसून येत आहे.