19 January 2020

News Flash

तुळजापूर मतदार संघात कमळ फुलणार का?

राष्ट्रवादीतून भाजपमध्ये दाखल झालेल्या राणाजगजितसिंह पाटील यांच्यासाठी तुळजापूर मतदार संघातील निवडणूक राजकीय अस्तित्वाची होण्याची शक्यता आहे.

(संग्रहित छायाचित्र)

|| रवींद्र केसकर

मधुकर चव्हाण यांना कडवे आव्हान :- राष्ट्रवादीतून भाजपमध्ये दाखल झालेल्या राणाजगजितसिंह पाटील यांच्यासाठी तुळजापूर मतदार संघातील निवडणूक राजकीय अस्तित्वाची होण्याची शक्यता आहे. त्यामुळे त्यांच्या समर्थकांकडून पाठिंबा मिळविण्यासाठी अधिक जोरकस प्रयत्न सुरू आहेत. या मतदार संघात काँग्रेसचे मधुकरराव चव्हाण यांची मजबूत पकड आहे. त्यांना राणाजगजितसिंह पाटील रोखणार का, हे पाहणे अधिक औत्सुक्याचे असणार आहे.

तुळजापूर विधानसभा मतदार संघात यंदा राजकीय खिचडी तयार झाली आहे. चार महिन्यांपूर्वी झालेल्या लोकसभा निवडणुकीत जाहीरपणे एकमेकांचे तोंड भरून कौतुक करणारे मधुकर चव्हाण आणि राणाजगजितसिंह पाटील हे दोघे सध्या एकमेकांच्या समोर शड्ड ठोकून उभे आहेत. जाहीरपणे कौतुक करणारे हे नेते प्रत्यक्षात मात्र एकमेकांच्या विरोधात उभे ठाकल्याचे चित्र जिल्ह्य़ात अनेक वेळा दिसून आले होते. त्यामुळे राणाजगजितसिंह पाटील यांना मते मिळविण्यासाठी अधिक कष्ट करावे लागणार आहेत. गेल्या काही निवडणुकांचे आकडे लक्षात घेता मतविभागणी मधुकर चव्हाण यांच्या जमेची बाजू राहिली आहे. या निवडणुकीतही वंचित आणि प्रहारच्या उमेदवारांनी चांगलाच राजकीय फेर धरला आहे. या मतदार संघात अशोक जगदाळे हे वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार आहेत. ते पूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये होते.

शेकापचा बालेकिल्ला असलेला तुळजापूरचा गड मधुकर चव्हाण यांनी जनसंपर्कातून काबीज केला आहे. मतदार संघाच्या पुनर्रचनेनंतर उस्मानाबाद तालुक्यातील ७२ गावांचा समावेश तुळजापूर विधानसभा मतदार संघात झाला. त्यामुळे उस्मानाबाद तालुका तुळजापूरच्या निवडणुकीत निर्णायक भूमिका ठरवू लागला आहे. राणाजगजितसिंह पाटील यांचे तेर हे मूळ गाव देखील तुळजापूर मतदार संघातच येते. या मतदार संघातून सातत्याने धोतर घातलेला आमदारच विजयी झाला आहे. धोतरवाले मधुकर चव्हाण आणि पॅन्टवाले राणाजगजितसिंह पाटील यांच्यातील चुरस जिल्ह्यचे आगामी नेतृत्व ठरविणार आहे. मागील निवडणुकीत मधुकर चव्हाण यांचे प्रमुख प्रतिस्पर्धी असलेले देवानंद रोचकरी, सुधीर पाटील हे दोघेही सध्या भाजपात आहेत.

मतविभागणी अशी होती

२०१४ मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत मधुकर चव्हाण यांनी सर्व प्रतिस्पर्धी उमेदवारांना धूळ चारत एकहाती विजय हस्तगत केला होता. मधुकर चव्हाण यांच्याविरोधात राष्ट्रवादी, शिवसेना, भाजपा आणि मनसे असे चार प्रमुख उमेदवार होते. राष्ट्रवादी काँग्रेसने ४१ हजार, शिवसेनेने २५ हजार, मनसेने ३५ हजार आणि भाजपाने ३६ हजार, असे एकूण सुमारे एक लाख ३० हजारपेक्षा अधिक मतांची विभागणी केली. मधुकर चव्हाण यांना ७० हजार मतदारांनी समर्थन दिले. चार प्रमुख प्रतिस्पध्र्यामध्ये झालेली मतविभागणी काँग्रेसच्या पथ्यावर पडली आणि मधुकर चव्हाण विजयी झाले. या निवडणुकीत मतविभागणी कमी होण्याची शक्यता वर्तविली जात आहे, ती काँग्रेससाठी धोक्याची घंटा ठरू शकते.

First Published on October 17, 2019 3:19 am

Web Title: vidhan sabha election ncp bjp akp 94
Next Stories
1 विदर्भाला विकासाच्या इंजिनाची गती मिळणार- मुख्यमंत्री
2 वाशीम जिल्हय़ातील तिन्ही मतदारसंघात चुरशीच्या लढती
3 आ. रवि राणांविरुद्ध उच्च न्यायालयात याचिका
Just Now!
X