महायुतीला समर्थन असल्याची घोषणा; राष्ट्रवादीच्या उमेदवाराची हकालपट्टी

संघटनेच्या हिताविरोधी भूमिका घेतल्याचा ठपका ठेवत राष्ट्रवादीचे काँग्रेस उमेदवार गणेश शिंदे यांना माथाडी संघटनेतून काढून टाकण्यात आल्याची माहिती सरचिटणीस नरेंद्र पाटील यांनी दिली. तर निवडणुकीनंतर शशिकांत शिंदे यांच्याबाबत निर्णय घेतला जाण्याचेही त्यांनी सूतोवाच केले. मात्र असा निर्णय घटनाबाह्य़ असून हा एकाधिकारशाहीचा प्रकार असल्याची टीका गणेश शिंदे यांनी केली. शिंदे हे पाटील यांच्या निर्णयाविरोधात न्यायालयात जाण्याच्या पवित्र्यात आहेत.

बुधवारी महाराष्ट्र माथाडी ट्रान्स्पोर्ट आणि जनरल युनियन या माथाडी संघटनेचे सरचिटणीस नरेंद्र पाटील यांनी आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेदरम्यान ही माहिती देण्यात आली. गणेश शिंदे हे माथाडी संघटनेत सचिव म्हणून पगारी कामगार होते. मात्र त्यांनी संघटनेच्या राजकीय भूमिकेविरोधात भूमिका घेतली. हा त्यांचा खोडसाळपणा असून दुसऱ्या पक्षाच्या व्यासपीठावर जाऊन माथाडी कामगार प्रगतीत अडथळा निर्माण करू नये, असाही त्यांनी इशारा दिला.

माथाडी संघटनेत एकाधिकारशाही

संघटनेचे अध्यक्ष शशिकांत शिंदे यांनीही कोरेगाव येथून राष्ट्रवादी काँग्रेसच्या तिकिटावर निवडणूक लढवत आहेत त्यांच्यावर का कारवाई करण्यात आली नाही या प्रश्नावर नरेंद्र पाटील यांनी सावध भूमिका घेत शशिकांत शिंदे यांच्यावरही निवडणुकीनंतर कारवाई करण्यात येईल, असे सांगत शिंदे हे अनेक वर्षांपासून संघटनेचे काम करत आले आहेत. ते अध्यक्ष असल्याने तडकाफडकी निर्णय घेता येत नाही. गणेश शिंदे मात्र पगारी व्यक्ती असल्याने कारवाई करण्यात आली.

 

ऐरोलीत पराभव दिसत असल्याने शिंदे यांच्यावर कारवाई केली गेली आहे. कारवाई करण्याचे कारणही विसंगत असून, हेच कारण असेल तर शिंदे यांनी निवडणूक लढण्याचा जेव्हा निर्णय घेतला तेव्हाच कारवाई होणे गरजेचे होते.अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादी काँग्रेस प्रदेश सरचिटणीस प्रशांत पाटील यांनी दिली.

भाजप-सेना युतीला माथाडी कामगारांच्या प्रमुख चार संघटनांनी जाहीर पाठिंबा दिल्याचे जाहीर केले असून पाठिंबा देणाऱ्या माथाडी संघटनांत महाराष्ट्र राज्य माथाडी ट्रान्स्पोर्ट आणि जनरल कामगार युनियन, महाराष्ट्र माथाडी आणि जनरल कामगार युनियन, अखिल भारतीय माथाडी ट्रान्स्पोर्ट आणि जनरल कामगार युनियन त्यांचा समावेश आहे ही माहिती देण्यासाठी पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती. या वेळी नरेंज्र पाटील, यशवंत पवार, दीपक रामिष्टे आणि प्रकाश पाटील उपस्थित होते.

‘लोकशाही पद्धतीला फाटा’

या बाबत शिंदे यांनी नरेंद्र पाटील यांना जोरदार प्रत्युत्तर देत दिवंगत अण्णासाहेब पाटील जयंती कार्यक्रमात माथाडी संघटनेत राजकीय भूमिकेमुळे संघटनेत भेद होणार नाही अशा वल्गना केल्या होत्या. मी स्वत: हातगाडी ओढली, पोती उचलली मात्र संघटनेचे काम प्रामाणिकपणे निष्ठेने केले. स्व. शिवाजी पाटील यांनी मला पद-प्रतिष्ठा दिली. माथाडी संघटनेत विविध पक्षांना मानणारे लोक आहेत, मात्र माझ्याबाबत दुटप्पी भूमिका का? मी पगारी नोकर जरी असलो तरी असे अचानक काढता येत नाही. त्यासाठी संघटनेने बैठक घेऊन लोकशाही पद्धतीने माझ्यावर कारवाई करणे गरजेचे असल्याचे मत शिंदे यांनी व्यक्त केले. त्यांचे असे वागणे हे एकाधिकारशाहीच आहे. त्यामुळे माथाडी संघटनेचे नुकसान होणार आहे.याविरोधात मी न्यायालयाचा दरवाजा ठोठावणार आहे, असा इशारा गणेश शिंदे यांनी दिला.

पगारी कामगाराचे काय चुकले?

दिवंगत अण्णासाहेब पाटील यांनी माथाडी संघटनेची स्थापना करताना केवळ कामगारहित हाच उद्देश होता. पहिल्यांदा यशवंतराव चव्हाण यांच्यावरील प्रभावाने अण्णासाहेब पाटील यांनी काँग्रेस विचारधारा स्वीकारली. त्यानंतरच्या काळात शरद पवार यांचा प्रभाव संघटनेवर होता, दरम्यान दिवंगत कामगार नेते शिवाजी पाटील यांनी शिवसेनेला पाठिंबा दिल्याचाही इतिहास आहे. या उलथापालथीमध्ये माथाडी कामगाराचे हित अबाधित राहिले, मात्र एखाद्या अन्य पक्षाला पाठिंबा दिला म्हणून त्याच्यावर कारवाईचे उदाहरण नाही. सुमारे दोन वर्षांपासून संघटनेचे सर्वोच्च पदाधिकारी असलेले शशिकांत शिंदे आणि नरेंद्र पाटील वेगवेगळ्या पक्षांत पदे भूषवीत आहेत, यात जर संघटनेच्या हिताला धक्का पोहोचत नसेल तर पगारी कामगाराने अन्य पक्षातून उमेदवारी घेतली तर काय फरक पडणार आहे? असा प्रश्न माथाडी कामगारांना पडला आहे.