|| इंद्रायणी नार्वेकर

अमराठी मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी अन्य भाषांतही प्रचार:- शिवसेनेचे युवानेते यांच्या प्रचारासाठी वरळीत लावलेल्या ‘केम छो वरली?’ या फलकावरून सुरू झालेली चर्चा फलक हटवल्यानंतर थांबली असली तरी, शिवसेनेच्या मराठी बाण्याचा मुद्दा आता नव्याने चर्चेला येणार आहे. मुंबईत वाढत चाललेल्या अमराठी मतदारांना साद घालण्यासाठी शिवसेनेने हिंदीच काय पण उर्दू भाषेलाही आपलेसे केले आहे. शिवसेनेच्या काही उमेदवारांच्या प्रचारात अन्य भाषांतील फलक सध्या कुतूहल आणि टीकेचा विषय ठरू लागले आहेत.

मराठी माणसाचे हित जपण्याचा निर्धार व्यक्त करत स्थापन झालेल्या शिवसेनेचे राजकारण मराठीच्या मुद्दय़ाभोवती अनेकदा फिरले आहे. दुकानांच्या मराठी पाटय़ांपासून मराठी भाषेच्या वापरासाठीच्या आग्रहापर्यंत अनेक मुद्दय़ांवर शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी वेळोवेळी आंदोलने केली. त्यामुळे मराठी भाषिकांमध्ये शिवसेनेबद्दल एक आपुलकीची भावना निर्माण झाली. मात्र, बदलत्या काळात मुंबईतून मराठी भाषिकच हद्दपार होऊ लागले असून अमराठींची संख्या वाढत चालली आहे. त्यामुळे शिवसेनेनेही यंदाच्या निवडणुकीत या मतदारांसाठी मराठीसह अन्य भाषांनाही जवळ केल्याचे दिसून येत आहे. वरळीमध्ये आर्थर रोड मेघनगर येथे चौकसभेच्या वेळी कार्यकर्त्यांनी गुजरातीत भाषण करून  मतदानाचे आवाहन केले. मुंबादेवीमध्ये शिवसेनेचे उमेदवार कट्टर शिवसैनिक पांडुरंग सकपाळ हे उभे आहेत. त्यांचा मतदारसंघ हा बहुतांशी मुस्लीमबहुल भाग आहे. या मतदारसंघात प्रचारफेरीच्या वेळी शिवसेनेने चक्क उर्दू लिहिलेले फलक झळकवले होते.  शिवसेनेने मराठीचा मुद्दा केव्हाच बाजूला ठेवून उत्तर भारतीय आणि गुजराती लोकांना आपलेसे करण्याचा उपक्रम सुरू केलेला आहे.  सुरुवातीची जी शिवसेनेची प्रतिमा होती तशी ती आता राहिली नाही, अशी प्रतिक्रिया राजकीय विश्लेषक प्रा. अरुणा पेंडसे यांनी दिली आहे.  मुंबईमध्ये अनेक भाषिक लोक एकत्र राहतात. शिवसेनेला स्वत:ला थेट धर्मनिरपेक्ष म्हणवून घेता येणार नाही, त्यामुळे तिथे शिवसेनेला हा बहुभाषिक प्रचार करावा लागतो आहे, असेही त्या म्हणाल्या.

 आदित्यचा ‘लुंगी’ अवतार

मुंबईतील दाक्षिणात्य लोकांची मक्तेदारी मोडून काढण्यासाठी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी ‘हटाव लुंगी बजाव पुंगी’ असा नारा १९६५ मध्ये दिला होता. मात्र त्यांच्या तिसऱ्या पिढीचे प्रतिनिधी असलेले, नेहमी जीन्स पॅण्ट आणि शर्टमध्ये दिसणारे युवराज आदित्य ठाकरे हे मात्र वरळीतील एका प्रचारसभेत थेट लुंगी घालूनच उतरले होते. त्यामुळे नेटकऱ्यांनी त्यांना चांगलेच फटकारले आहे. ‘घालुनिया मद्रासी लुंगी, वाजवी मराठीची पुंगी’ अशा शब्दांत शिवसेनेच्या या बदलत्या भूमिकेचा लोकांनी समाचार घेतला आहे.

धनुष्यबाण नाही.. तीरकमान

शिवसेनेचे निवडणूक चिन्ह असलेले धनुष्यबाण ही शिवसेनेची खास ओळख बनली आहे. प्रचारफेऱ्यांमध्ये पूर्वी ‘धनुष्यबाण, धनुष्यबाण, धनुष्यबाण’ अशा शब्दांत मतदारांना साद घातली जात असे. काही मतदारसंघांत मात्र ‘तीरकमान, तीरकमान, तीरकमान’ अशी आरोळी ऐकायला मिळत आहे. राजकीय पक्ष म्हणून मान्यता मिळण्यापूर्वी शिवसेनेने उगवता सूर्य, इंजिन, ढाल-तलवार अशा चिन्हांवर निवडणूक लढवली होती. शिवसेनेने धनुष्यबाण ही निशाणी मागितली व ती निवडणूक आयोगाने दिली. मात्र आता शिवसैनिक त्याचेही भाषांतर करू लागले आहेत. धनुष्यबाणाचे तीरकमान असे भाषांतर ऐकणे, क्लेशदायक असल्याचे काही जुन्या शिवसेना कार्यकर्त्यांचे म्हणणे आहे.