हितेंद्र ठाकूर यांच्याकडे २० कोटींची मालमत्ता; शिवसेनेचे विजय पाटील ११ कोटींचे धनी

वसई आणि नालासोपारा विधानसभा मतदारसंघातील उमेदवारांच्या लढती स्पष्ट झाल्या आहेत. वसईत दोन कोटय़धीश तर नालासोपारा मतदारसंघात तीन कोटय़धीश उमेदवार आहेत.

वसई मतदारसंघात एकूण ६ उमेदवार रिंगणात आहेत. त्यात शिवसेना आणि बहुजन विकास आघाडी या प्रमख पक्षांसह बहुजन समाज पार्टी, वंचित बहुजन आघाडी, महाराष्ट्र नवनिर्माण सेना आदी पक्ष रिंगणात आहेत. याशिवाय एक अपक्ष उमेदवार आहे. या ६ उमेदवारांपैकी दोन उमेदवार कोटय़धीश असून सर्वात श्रीमंत उमेदवार बहुजन विकास आघाडीचे हितेंद्र ठाकूर आहेत. तर दुसऱ्या क्रमांकावर शिवसेनेचे उमेदवार विजय पाटील आहेत. हितेंद्र ठाकूर यांची स्थावर आणि जंगम मालमत्ता २० कोटी ४० लाख ५२ हजार ५९६ एवढी तर विजय पाटील यांनी ११ कोटी २२ लाख ०३ हजार १४९ इतकी दाखवली आहे. हितेंद्र ठाकूर यांच्यावर एकूण ५, विजय पाटील यांच्यावर ३ गुन्हे, मनसे उमेदवार प्रफुल ठाकूर यांच्यावर २ गुन्हे दाखल आहेत.

नालासोपाऱ्यात तीन कोटय़धीश

नालासोपारा मतदारसंघात १४ उमेदवार रिंगणात आहेत. शिवसेना, बहुजन विकास आघाडी या प्रमुख पक्षांबरोबर हिंदुस्थान जनता पार्टी, बहुजन समाज पार्टी, संघर्ष सेना, वंचित बहुजन आघाडी, बहुजन महापार्टी आदी पक्षांसह ७ अपक्ष रिंगणात आहेत. नालासोपारा मतदारसंघातील १४ उमेदवारांपैकी तीन उमेदवार कोटय़धीश आहेत. सर्वात श्रीमंत उमेदवार बहुजन विकास आघाडीचे क्षितिज ठाकूर आहेत. त्यांची मालमत्ता ८ कोटी ३२ लाख ३३ हजार ७२९ एवढी आहे. शिवसेना उमेदवार प्रदीप शर्मा हे दुसऱ्या क्रमांकाचे श्रीमंत उमेदवार आहेत. त्यांची मालमत्ता १ कोटी ८१ लाख ९१ हजार ४०८ इतकी आहे. अपक्ष उमेदवार डॉ. विजया समेळ यांनी १ कोटी १६ लाखांची संपत्ती दाखवली आहे. सर्वात कमी संपत्ती अपक्ष उमेदवार सतीश वारेकर यांनी ५२,०००  दाखवली आहे.

शिवसेनेचे उमेदवार प्रदीप शर्मा यांच्यावर ४ गुन्हे दाखल आहेत. वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार प्रवीण गायकवाड यांच्यावर ३ गुन्हे, अपक्ष उमेदवार अमर कवळे २ गुन्हे दाखल आहेत.

वनगांकडे ३५ लाखांची स्थावर मालमत्ता

पालघर : पालघर मतदारसंघातील श्रीनिवास वनगा यांच्याकडे ३४ लाख ६७ हजार ३३३ रुपयांची स्थावर मालमत्ता आहे. ती त्यांना वारसाने मिळालेली मालमत्ता आहे तर त्यांच्या पत्नीची दोन लाख नऊ हजार तर त्यांच्या पत्नीने संपादित केलेल्या मालमत्तेची रक्कम १८ लाख आहे. श्रीनिवास वनगा यांनी उमेदवारी अर्ज दाखल करताना दिलेल्या घोषणापत्रात त्यांची जंगम मालमत्ता नऊ  लाख ७० हजार २३० रु. असून त्यांची पत्नी सुमन यांची जंगम मालमत्ता आठ लाख ४६ हजार १२३ रु. आहे. यामध्ये श्रीनिवास वनगा यांच्याकडे एक दुचाकी तर एक चारचाकी वाहन आहे. वनगा यांनी विविध बँका व वित्तीय संस्था यांच्याकडून ११ लाख

२१ हजार ३८५  रुपयांची कर्जे घेतलेली आहेत. काँग्रेसकडून उमेदवारी मिळालेले योगेश नम यांची जंगम मालमत्ता १७ लाख २५ हजार, तर स्थावर मालमत्ता आठ लाख ६६ हजार आहे.