महाविकास आघाडीचे १६२ आमदार ग्रँड हयात या हॉटेलमध्ये पोहचले आहेत. काँग्रेस, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस असे तीन पक्षांचे आमदार पहिल्यांदाच एकत्र आले आहेत. या ठिकाणी या सगळ्या आमदारांना एकजुटीची शपथ दिली जाणार आहे.   शिवसेनेचे सगळे आमदार हे हॉटेल ललित या ठिकाणी वास्तव्यास आहेत. काँग्रेसनेही त्यांचे आमदार जयपूर आणि भोपाळला नेले आहेत. आत आज संध्याकाळी सगळे म्हणजेच १६२ आमदार ग्रँड हयातमध्ये जमणार आहेत.

महाविकास आघाडीची बैठक शुक्रवारी पार पडली. या बैठकीत शिवसेनेचे उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होतील यावरही सहमती झाल्याचं शरद पवार यांनी सांगितलं. मात्र शनिवारची सकाळ उजाडली आणि महाराष्ट्रात राजकीय भूकंप झाला. कारण मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री म्हणून अजित पवार यांनी राज्यपालांच्या उपस्थितीत शपथ घेतली.

महाराष्ट्रात झालेला हा राजकीय भूकंप हा सगळ्यांसाठीच धक्का होता. त्यानंतर शरद पवार, उद्धव ठाकरे यांनी संयुक्त पत्रकार परिषद करुन आणि काँग्रेसने आणखी एक पत्रकार परिषद करुन भाजपावर निशाणा साधला. हे सगळं प्रकरण कोर्टातही गेलं आहे. आता मंगळवारी सकाळी १० च्या दरम्यान या संदर्भातला निकाल येऊ शकतो. दरम्यान या तीन दिवसात आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झडत आहेत. आता ग्रँड हयात मध्ये काय काय होणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.